Join us

शेतकरी वळताहेत संकरित भातशेतीकडे

By admin | Published: July 02, 2014 11:54 PM

ग्रामीण भागातील शेतकरी कमी वेळात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी गेल्या दहा-बारा वर्षापासून संकरित भातबियाणांकडे वळत आहेत

कासा : ग्रामीण भागातील शेतकरी कमी वेळात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी गेल्या दहा-बारा वर्षापासून संकरित भातबियाणांकडे वळत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या भाताच्या जाती दुर्मीळ होत आहेत.ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील शेतकरी पूर्वीच्या काळी डांगी, कुडई, जिरबोटी, कसबई, जया, रत्ना, पाचऐकी, जवारा आदी मोठी दाण्याची तर लहान दाण्याचे कसदार भातबियाणे घेत असत. कुडई भातापासून मिळणारे तांदूळ लालसर असून त्याचा भात हा गोडसर असल्याने गरीब कुटुंबे पूर्वीच्या काळी वरण किंवा भाजी न घेता त्याचा आहारात वापर करत असत. त्याचा भात चवदार व पौष्टिक असल्याचे शेतकरी म्हणतात. त्याचप्रमाणे पाचऐकी व डांगी भाताचा वापर मोठ्या प्रमाणात पोहे बनविण्यासाठी करत असत. सदर भातरोपांची उंची खुप असल्याने शेतकऱ्यांना गाई, म्हशींना, बैलांना पावळी जास्त मिळत असून गुरेही ती पावळी चवीने व आवडीने खात असल्याचे शेतकरी सुरेश भगत यांनी सांगितले.परंतु सदर भातपिकांसाठी साधारण १३० ते १४० दिवसांचा कालावधी तर कसबई सारख्या भाताचे पीक हाती येण्यास १५० दिवसांचा कालावधी येतो. त्याचा सुगंध मात्र शेतात पीक असतानाही येतो. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी कोलम पीक मोठ्या प्रमाणात घेत. मात्र उत्पन्न कमी व कालावधी जास्त त्यामुळे शेतकऱ्यांनी या बियाणांकडे पाठ फिरवली असल्याने सदर पिके आता दुर्मिळ होत आहेत.पावसाची अनियमितता, मजुरांची टंचाई यामुळे शेतकरी आता कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित व संशोधित भात पिकांच्या वाणांकडे वळत आहेत. तर काही काळात पूर्वीचे वाण नामशेष होतील, असे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.