Join us

शेतकरी वळताहेत संकरित भात बियाणांकडे

By admin | Published: June 13, 2015 10:58 PM

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कमी वेळात जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी मागील काही वर्षात जुन्या भातबियाण्याकडे पाठ फिरविली आहे.

कासा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कमी वेळात जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी मागील काही वर्षात जुन्या भातबियाण्याकडे पाठ फिरविली आहे. संकरित नवीन जातीची भातबियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रात गर्दी केली आहे. परिणामी पूर्वी वापरल्या जाणाऱ्या भातबियाण्यांच्या जाती दुर्मिळ होत आहेत. पूर्वी शेतकरी डांगी, कुडई, जिरबोटी, कसबई, जया, रत्ना, पाचऐकी, जवारा, सुरती, कोलम आदी मोठ्या दाण्याची तर काही लहान दाण्यांचे कसदार भातबियाणे घेत होते. कुडई भात पिक कमी कालावधीत मिळते तसेच यापासून मिळणारे तांदुळ लालसर असून त्याचा भात हा गोडसर असल्याने गरीब कुटूंबे पूर्वीच्या काळी भाजी नसताना त्याचा आहारात वापर करायचे. त्याचप्रमाणे पाचऐकी व डांगी भाताचा वापर मोठ्या प्रमाणात पोहे बनविण्यासाठी करत होते. या भातपिकासाठी साधारण १३० ते १४० दिवसांचा कालावधी लागतो. तर, कसबई सारख्या भाताचे पिक हाती येण्यास १५० दिवसांचा कालावधी लागतो. त्याचा सुगंध मात्र शेतात पिक असतानाही येतो. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी कोलम पीक मोठ्या प्रमाणात घेत मात्र उत्पन्न कमी, कालावधी जास्त त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर जुन्या भाताकडे पाठ फिरविली आहे.पावसाची अनियमीतता, मजुरांची टंचाई, यामुळे शेतकरी आता कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी संकरित व संशोधीत भातपिकांची लागवड करत आहेत. त्यामुळे जुन्या भातांच्या वाणांच्या जाती दुर्मिळ झाल्या आहेत. (वार्ताहर)