शेतकरी आठवडी बाजाराला स्थानिक गुंडांचा जाच; पैशांची मागणी करत दिला जातो त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 08:24 IST2025-03-10T08:23:55+5:302025-03-10T08:24:05+5:30
'लोकमत'च्या वृत्तानंतर कंपन्यांनी मांडल्या व्यथा

शेतकरी आठवडी बाजाराला स्थानिक गुंडांचा जाच; पैशांची मागणी करत दिला जातो त्रास
योगेश बिडवई
मुंबई : कृषी पणन मंडळाने जबाबदारी झटकल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांना महानगरांमध्ये शेतकरी आठवडी बाजार भरवण्यासाठी महापालिकेकडून जागेची परवानगी मिळवण्यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आठवडी बाजार सुरू केल्यानंतर स्थानिक गुंडांचा जाचही काही ठिकाणी सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी होत आहे.
संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार अभियानातील मुंबई, ठाण्यातील ९० टक्के बाजार बंद झाले आहेत. आता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन आठवडी बाजार सुरू केले आहेत. मात्र, त्यांना अडथळ्यांवर मात करावी लागते. काही ठिकाणी स्थानिक गुंडांचा त्रास होतो. त्यातून कल्याण येथे आठवडी बाजार भरवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मारहाण झाली होती. शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. टिटवाळा (जि. ठाणे) येथेही त्रासाला कंटाळून बाजार दुसरीकडे हलविला.
आम्ही ४८ बाजार भरवतो. कल्याण-डोंबिवलीत १२ बाजार आहेत. स्थानिक गुंड, शेतीशी संबंध नसलेले व्यापारी यांच्या त्रासातून आम्ही कल्याणमधील बाजार बंद केला. शेतकऱ्यांना मारहाण झाल्याने पोलिस तक्रारही केली - मयूर पवार, विंग्रो अॅग्रिटेक कंपनी
आम्ही संस्कार संस्थेच्या माध्यमातून १० आठवडी बाजार सुरू केले होते. यात जागा शोधण्यासाठी पणन मंडळाला आम्ही सर्व मदत केली. कोविडनंतर ते बाजार बंद झाले. शेतमाल विक्रीत मदत करणे हेच पणन विभागाचे काम आहे. पणनचे अधिकारी अशाप्रकारे जबाबदारी झटकू शकत नाहीत. स्थानिक पातळीवर त्यांना लोकप्रतिनिधी, संस्था मदत करतील - संजय केळकर, आमदार, ठाणे शहर
आमची शेतकरी कंपनी कृषी पणन मंडळाकडून साधन संस्था म्हणून नियुक्त झाली. आमच्यामार्फत पुण्यात ५६ बाजार सुरू आहेत. महामुंबईत १२ बाजार आहेत. छत्रपती संभाजीनगरला आठवडी बाजार सुरू केला. बाजार सुरू करण्यास बऱ्याच बाबींची पूर्तता करावी लागते. परवानगी मिळणे, जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा - नरेंद्र चव्हाण, श्री स्वामी शेतकरी उत्पादक कंपनी