Join us

'नोगा' उत्पादनांची विक्री वाढल्यास राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार - पांडुरंग फुंडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 9:03 PM

‘नोगा’ उत्पादनाच्या मार्केटिंग व विक्रीवर भर द्यावा. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. देशातील 20 महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकावर नोगा उत्पादनाचे विक्री केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.

मुंबई:  ‘नोगा’ उत्पादनाच्या मार्केटिंग व विक्रीवर भर द्यावा. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. देशातील 20 महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकावर नोगा उत्पादनाचे विक्री केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अधिनस्थ असलेल्या नोगा उत्पादनांच्या आढावा कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक करंजकर उपस्थित होते. आंबा, अननस, टोमॅटो, संत्रा या फळांवर प्रक्रिया करुन जॅम, स्क्वॅश, सीरप, ज्यूस, केचप, सॉस आदी उत्पादने नोगामार्फत बनविली जातात. त्यांना पंचतारांकित हॉटेल, रेल्वे, एअर इंडिया, मिलिटरी कॅन्टीन येथून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचबरोबर नेपाळ येथे देखील ही उत्पादने निर्यात केली जातात. मोतीबाग व हिंगणा येथील युनिटचे एकत्रिकरण करुन हिंगणा (नागपूर) येथे सध्या उत्पादन केले जात आहे. दररोज सात मेट्रीक टन एवढी उत्पादन क्षमता असून सन 2017-18 साठी 12 कोटी रुपयांचे विक्री उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नुकतेच नोगामार्फत देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेबरोबर करार करण्यात आला असून या संस्थेमार्फत आंबा, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, फणस, कोकम, जांभूळ, अननस या फळांवर प्रक्रिया केली जाणार आहे. मँगो पल्पचे उत्पादन करुन नोगा ब्रॅण्डने त्याची विक्री केली जाणार आहे.सध्या हिंगणा येथील नोगा प्रकल्पाच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर उत्पादन क्षमता अधिक होईल, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नोगाच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून भारतीय रेल्वेच्या राजधानी, शताब्दी अशा प्रकारच्या 135 महत्वपूर्ण रेल्वेसेवांमध्ये नोगा केचप आणि सॉस याचा पुरवठा केला जातो. नोगाचे मार्केटिंग अधिक होण्याकरिता देशातील महत्वपूर्ण अशा 20 रेल्वे स्थानकांवर नोगा किऑस्क सुरु करण्याबाबत प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. नोगाच्या उत्पादनाची विक्री वाढल्यास त्याचा लाभ राज्यातील शेतकरी बांधवांना होईल यासाठी त्याचे अधिकाधिक मार्केटिंग करावे, असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी यावेळी केले.

टॅग्स :पांडुरंग फुंडकर