मुंबई: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला होता, असं मोदी यांनी सांगितलं.
तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय आहे, असं अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटलं आहे. तसेच कायदे मागे घेण्याच्या मागणी बरोबरच शेतकऱ्यांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण मिळावे ही सुद्धा आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने या बद्दल सुद्धा सकारात्मक घोषणा करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं नवले यांनी सांगितलं.
आज शेतकरी आंदोलनाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात शेतकरी आंदोलनात 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व शाहिद शेतकऱ्यांची आज आठवण होते आहे. शेतकरी शहीदांचे हे बलिदान शेतकरी कधीच विसरणार नाहीत. शेतकऱ्यांना शेती संकटातून संपूर्णपणे बाहेर काढल्या आपला संघर्ष थांबविणार नाहीत, असंही नवले यांनी येवळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.