वसई : पावसाळा जवळ आल्याने वसई-विरार उपप्रदेशाच्या पूर्व भागातील शेतकरीवर्ग कामाला लागला आहे. यंदा पाऊस लवकर पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त झाल्यामुळे शेतकरीवर्गात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बी-बियाणे व खते वेळेवर मिळावीत अशी अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. वसई-विरार उपप्रदेशाच्या पूर्व भागात चांदीप, मांडवी, शिरगाव, भाताणे, आडणे, नवसई, खानिवडे, हेदवडे, भारोळ, सकवार, कामण, चिंचोटी, कोल्ही, पारोळ, शिवणसई, सायवन, उसगांव व पोमण इ. गावात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.वसई पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे दरवर्षी शेतकर्यांना पावसाळ्यापूर्वी माफक दरात बी-बियाणे व खते विकण्यात येतात. यंदाही कृषी विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे. वसई-विरार पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात खार भातशेती करण्यात येते. (प्रतिनिधी)
शेतीच्या कामांनी घेतला वेग
By admin | Published: May 24, 2014 12:25 AM