आकर्षक, मनमोहक घड्याळांनी सजली दुकाने, ‘फर्स्ट कॉपी’लाही मोठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:27 AM2017-10-04T02:27:03+5:302017-10-04T02:27:22+5:30
सध्या सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत. भाऊबीजेसह दिवाळी आणि पाडव्याला नातेवाइकांना, मित्रांना गिफ्ट देण्याचीही पद्धत रुजत आहे.
अक्षय चोरगे
मुंबई : सध्या सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत. भाऊबीजेसह दिवाळी आणि पाडव्याला नातेवाइकांना, मित्रांना गिफ्ट देण्याचीही पद्धत रुजत आहे. गिफ्टसाठी मनगटी घड्याळांना सर्वाधिक पसंती दिली जात असल्याचे घड्याळ विक्रेत्यांनी सांगितले. पाचशे रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या आकर्षक आणि मनमोहक घड्याळांनी सध्या दुकाने सजली आहेत. त्यासोबतच मोठ्या ब्रँड्सच्या घड्याळांची ‘फर्स्ट कॉपी’ घड्याळे एक ते दोन हजार रुपयांमध्ये तर ड्युप्लिकेट घड्याळे शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
मुंंबईत टायटन, रॅडो, ओमेगा, टिस्सॉट, फास्ट्रॅक, जी-शॉक, कॅसिओ, टायमेक्स, डिझेल, सोनाटा या ब्रँड्सच्या घड्याळांना सर्वाधिक मागणी असल्याचे घड्याळ विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या ब्रँड्सच्या घड्याळांची किंमतही हजारांपासून लाखांच्या घरात आहे. महागड्या किमती परवडतात असे लोक ही घड्याळे खरेदी करतात. ज्यांना या किमती परवडत नाहीत, असे लोक फर्स्ट कॉपी किंवा ड्यूप्लिकेट घड्याळे खरेदी करतात. मोठ्या ब्रँड्सची घड्याळे त्या-त्या ब्रँड्सच्या शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत.
कशी तयार होते ‘फर्स्ट कॉपी’?
मनिष मार्केटमध्ये ‘फर्स्ट कॉपी’ घड्याळ आणले जात नाही. तर घड्याळाचे यंत्र चिनी कंपन्यांकडून येते. उल्हासनगरहून घड्याळाचे स्टीलचे, चामड्याचे आणि फायबरचे पट्टे येतात. घड्याळाचे डायल प्रामुख्याने गुजरातेतून येत असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. घड्याळाचे असे विविध पार्ट्स मनिष मार्केटमधील मोठे व्यापारी जोडून ही घड्याळे तयार करून घाऊक विक्रेत्यांना विकतात, असेही त्यांनी सांगितले.
गोल्ड, सिल्व्हर कलरलाही मागणी
टायटन कंपनीच्या गोल्ड आणि सिल्व्हर पट्ट्याच्या घड्याळांना मोठी मागणी असते. १ हजार पाचशे रुपयांपासून ते १ लाख रुपये किमतीत गोल्ड घड्याळे, १ हजार रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंत सिल्व्हर घड्याळे उपलब्ध आहेत. त्यासोबतच चामड्याचे पट्टे असलेल्या घड्याळांचाही चाहता वर्ग आहे. तरुणांसाठी फास्ट्रॅकची वेगळी रेंज कंपनीने आणली आहे. उत्सवांचे दिवस सुरू असल्याने व्यवसायदेखील भरारी घेत आहे.
- अभिजित देसाई, व्यवस्थापक, वर्ल्ड आॅफ टायटन, दादर
मनिष मार्केट फर्स्ट कॉपीचे ‘केंद्र’
मुंबईत कोणत्याही ब्रँडच्या फर्स्ट कॉपीसाठी भेंडी बाजार येथील मनिष मार्केट प्रसिद्ध आहे. मनिष मार्केटमध्ये फास्ट्रॅक, टायटन, सोनाटा आणि जी-शॉक या ब्रँडसह अन्य मोठ्या ब्रँडच्या घड्याळांची फर्स्ट कॉपी घड्याळे उपलब्ध आहेत. पाचशे ते पंधराशे रुपयांमध्ये या मोठ्या ब्रँडची फर्स्ट कॉपी घड्याळे मनिष मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
‘फर्स्ट कॉपी’ कुठे मिळेल?
भेंडी बाजार येथील मनिष मार्केट, कुलाबा कॉजवे मार्केट, उल्हासनगर, दादर पूर्व, सॅण्डहर्स्ट रोड, चोर बाजार, गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये फर्स्ट कॉपी घड्याळे सर्रास उपलब्ध आहेत. ड्यूप्लिकेट घड्यांळासाठी दादर, कुर्ला, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतचा
भुयारी मार्ग, अंधेरी, वांद्रे या
रेल्वे स्थानकांलगतही उपलब्ध आहेत.