ड्रग्ज विक्रीविरोधात वेगाने कारवाई
By admin | Published: February 7, 2016 04:13 AM2016-02-07T04:13:08+5:302016-02-07T04:13:08+5:30
मुंबई आणि उपनगरातील अमलीपदार्थांच्या विक्रीचे वास्तव आणि त्यात ओढली गेलेली तरुणाई; या विदारक स्थितीचा ‘लोकमत’ने स्टिंगद्वारे पर्दाफाश करताच त्याची दखल थेट राज्याचे पोलीस
‘लोकमत’ स्टिंग इफेक्ट : पोलीस महासंचालकांनी घेतली दखल
मुंबई : मुंबई आणि उपनगरातील अमलीपदार्थांच्या विक्रीचे वास्तव आणि त्यात ओढली गेलेली तरुणाई; या विदारक स्थितीचा ‘लोकमत’ने स्टिंगद्वारे पर्दाफाश करताच त्याची दखल थेट राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी घेतली. अमलीपदार्थांच्या विक्रीविरोधात वेगाने कारवाई करण्यासह अधिकाधिक जनजागृती व्हावी म्हणून यासंबंधीच्या सूचनाही पोलीस विभागाला देण्यात येणार आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
गोवंडीसह रे रोडवर खुलेआमपणे अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मांडले.
स्टिंगद्वारे संबंधित यंत्रणा कशी पोखरली गेली आहे? याचे स्पष्ट चित्र निदर्शनास आणून दिले. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आम्ही ‘पोलीस मित्र’ या संकल्पनेद्वारे याबाबत अधिक जनजागृतीचा विडा उचलत आहोत. अनेकदा या प्रकरणातील तस्करांवर कारवाई होते. मात्र जर तरुणाईनेच हे सगळे नाकारले तर याला आवर घालणे अधिक सोपे जाईल. महत्त्वाचे म्हणजे आम्ही कारवाईवर भर देतच आहोत परंतु पोलिसांनाही याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
‘लोकमत’ स्टिंगनंतर तस्करांवर धाडी..
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी घटनास्थळी धाडी टाकण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी, मानखुर्द, बैंगनवाडी आणि रे रोड परिसरात शनिवारीच अमलीपदार्थविरोधी पथकाच्या चार टीम रवाना झाल्या आहेत, असे अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.
स्थानिक ठाण्यांसह अमलीपदार्थविरोधी तपास पथकही या प्रकरणी कारवाई करत आहे. अमलीपदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढविण्यात येईल.
- दत्तात्रय पडसलगीकर, पोलीस आयुक्त, मुंबई