दिव्यामुळे ‘फास्ट’ गोंधळ
By Admin | Published: September 14, 2016 04:29 AM2016-09-14T04:29:39+5:302016-09-14T04:29:39+5:30
कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या जलद गाड्यांना दिवा स्थानकात मिळणाऱ्या थांब्यामुळे डब्यात चेंगराचेंगरी वाढण्याची भीती आहे.
कल्याण : कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या जलद गाड्यांना दिवा स्थानकात मिळणाऱ्या थांब्यामुळे डब्यात चेंगराचेंगरी वाढण्याची भीती आहे. कल्याण, डोंबिवलीचे प्रवासी ज्या दिशेने ठाण्यात उतरतात त्याचदिशेने दिव्यातील प्रवासी चढणार असल्याने डब्यात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होईल आणि ठाण्यात उतरणाऱ्या प्रवाशांचे हाल होतील. दिव्यातील प्रवाशांनाही या गाड्यांचा उपयोग होणार नाही. त्यामुळे दिव्यातूनच जलद गाड्या सोडण्याचा नवा मुद्दा समोर आला आहे.
गेल्या वर्षी दिव्यात झालेल्या प्रवाशांच्या आंदोलनानंतर तेथे जलद गाड्या थांबवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर दिव्यात धीम्या आणि जलद मार्गाचे काम हाती घेण्यात आले. दिव्यात फलाट एकची नव्याने बांधणी करण्यात आली. दुतर्फा फलाटाच्या कामाला अजून वर्ष लागणार असले, तरी तोवर मार्ग वळवून दिवाळीनंतर तेथे धीम्या गाड्या थांबवल्या जातील. त्याचप्रमाणे सध्याच्या फलाट दोनशेजारी जलद गाड्या थांबवण्यासाठी फलाट वाढवण्यात आला आहे. मात्र या फलाटाची दिशा डोंबिवलीच्या फलांटांच्या विरूद्ध असल्याने ठाण्याच्या दिशेला उतरणारे कल्याण, डोंबिवली व त्यापुढील प्रवासी आणि दिव्यात चढणारेल प्रवासी यांच्यात दररोज प्रत्येक गाडीत रेटारेटी होण्याची चिन्हे आहेत. तोच प्रकार ठाण्यात उतरतानाही घडेल. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांना या जलद गाड्यांचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे. जलद गाड्यांत सध्या डोंबिवलीतील प्रवाशांनाही चढता येत नाही. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांसाठी गाड्या वाढतील, पण त्यात चढता येईल का हा नवाच प्रश्न निर्माण होणार आहे.
दिव्या स्थानकातून खास करून कोकण रेल्वे आणि वसईसाठी वापरल्या जाणाऱ्या फलाटांवरून स्वतंत्र जलद गाड्या सोडल्या तरच गर्दीचा प्रश्न निकाली निघू शकेल, पण रेल्वेने त्यावर कामच केलेले नाही. त्यामुळे गर्दीचा नवा प्रश्न तयार होईल.
स्लो लोकलसाठी रेल रोको
डोंबिवली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार नोव्हेंबरपासून दिवा स्थानकात जलद लोकल थांबणार आहेत. मात्र, या लोकल पुढे जलद मार्गाने थेट ठाण्याला नेण्याऐवजी त्या धीम्या मार्गानेच मुंब्रा, कळवामार्गे चालवाव्या. ठाण्यानंतर त्या जलद मार्गावर वळवाव्या. त्याचा फायदा मुंब्रा, कळवा येथील हजारो प्रवाशांना होईल. तसे न केल्यास रेल रोको केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला.
‘लोकमत’शी बोलताना परांजपे म्हणाले, ‘दिव्याला थांबा हवाच. पण त्यासोबत मुंब्रा-कळव्यातील प्रवाशांवर अन्याय का? आधीच धीम्या लोकलमध्ये तेथील प्रवाशांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळेच अनेकदा कळव्यात आंदोलने होतात. मुंब्य्रात रेटारेटी होते. रेल्वे प्रशासनाने तेथील प्रवाशांच्या यातनांचाही अभ्यास करावा. त्यांना होणार त्रास जाणून घ्यावा. मुंब्रा स्थानकात सकाळी प्रवासी जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने लोकलमध्ये चढतात. त्याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा.’
‘दिव्यात आंदोलन झाले म्हणून तेथे थांबा मिळणार असेल तर मग त्याच न्यायाने मुंब्रा-कळव्यात आंदोलन झाले की तेथेही अशी सुविधा मिळणार का? तसे झाले तर आंदोलने करा आणि सुविधा पदरात पाडून घ्या, असा नवा पायंडा पडेल. आधी सुविधांचे सुसज्ज जाळे विस्तारा आणि त्यानंतर प्राधान्याने सुविधा द्याव्यात, असा विचार रेल्वे का करत नाही. डोंबिवलीनंतर दिवा, मुंब्रा आणि कळवा या मार्गावरील प्रवाशांना जलद लोकलचा पर्याय नाही. त्यामुळे त्यांना केवळ धीम्या लोकलनेच प्रवास करावा लागतो. अनेकदा तांत्रिक बिघाड झाला की या मार्गावरील प्रवाशांचे नियोजन कोलमडते. अन्य ठिकाणचे प्रवासी जलदमार्गाने पुढे तरी जातात. पण या ठिकाणच्या प्रवाशांचे काय? त्यामुळे दिव्यात आलेली लोकल जलद मार्गाऐवजी कळवामार्गे न्यावी. त्यामुळे दिवा स्थानकातून लोकल जलद मार्गावर वळवण्यासाठी लागणारी वेळ वाचेल. परिणामी, वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. पण, असे न झाल्यास वेळापत्रक कोलमडेल. त्यामुळे मुंबईकडे जाणारी धीमी, जलद मार्गाची वाहतूक, कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गाच्या वाहतुकीला दररोज फटका बसू शकतो. मध्य रेल्वेच्या वेळापत्रक नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर गांभीर्याने विचार करावा आणि वाहतूक सुरू करण्यापूर्वीच आवश्यक ते बदल करावेत. अन्यथा रेल रोको करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
गेल्यावर्षी २ जानेवारीला दिव्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन करत रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला होता. त्याची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी येथील प्रवाशांना न्याय मिळवून देत येथे जलद लोकल थांबवण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने कामही हाती घेतले. त्यामुळे दिवा स्थानकाचा झपाट्याने कायापालट होत आहे. या निर्णयाचे दिवा रेल्वे प्रवासी संघटना, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था स्वागत करत आहे.