मुंबई : मुंबई-पुणे शहरांदरम्यानचा एक्स्प्रेस हायवेवरील प्रवास आणखी सुपरफास्ट करण्यासाठी बोर घाटात मिसिंग लिंकचे महत्त्वाकांक्षी काम सुरू आहे. परंतु, कोरोना संक्रमण काळातील निर्बंधामुळे या कामात अडथळे निर्माण झाल्याने काम पूर्णत्वाची मुदत किमान ६ महिने लांबणीवर पडली. त्यामुळे ६ किमी अंतर आणि सुमारे २० मिनिटांचा कालावधी कमी करणाऱ्या या प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.मुंबई-पुणे प्रवासासाठी एक्स्प्रेस हायवे (६ मार्गिका) आणि जुना मुंबई महामार्ग (४ मार्गिका) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, हे दोन्ही रस्ते खालापूर येथे एकत्र मिळतात आणि खोपोली एक्झिट येथे पुन्हा स्वतंत्र होतात. दोन महामार्गांच्या १० मार्गिकांमधून येणाऱ्या वाहनांना या संयुक्त पट्ट्यातील चार मार्गिकांवरूनच मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होतात. अवजड वाहने बंद पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे घाटातील प्रवास अनेकदा त्रासदायक ठरतो. ही कोंडी फोडण्यासाठी खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट अशी मिसिंग लिंक विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ८.९२ आणि १.७७ किमी. लांबीचे दोन बोगदे आणि ७९० आणि ६५० मीटर्सचे दोन केबल ब्रिज येथे उभारले जात आहेत. एमएसआरडीसीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी नवयुग आणि ॲफ्काॅन या कंत्राटदारांची नियुक्ती झाली होती. प्रत्यक्ष काम सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू झाले असून निविदेतल्या अटीनुसार ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ते आता लांबणीवर पडले आहे.
केबल ब्रिजच्या सुरक्षेमुळे विलंबघाटातील वाऱ्याचा वेग आणि सुरक्षेसाठी अन्य आघाड्यांवरील सर्वेक्षण करून काम मार्गी लावण्याचे नियोजन होते. त्यासाठी कोरियातील सल्लागारांची नियुक्ती केली होती. जुलैमध्ये तो अभ्यास अपेक्षित होता. मात्र, कोरोना निर्बंधामुळे हा अभ्यासगट भारतात येऊ शकला नाही. त्यामुळे कामाला विलंब झाला. शिवाय काही महिने कामगारांची संख्या कमी होती. त्याचाही परिणाम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.