लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवर सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चर्चगेट येथे बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुनर्विकासाची कामे प्राथमिकतेसह जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना प्रभू यांनी संबंधितांना केल्या आहेत.आढावा बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रभात सहाय हे अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रभू यांनी विविध स्थानकांच्या निविदा आणि आग्रही कंपनी यांचा तपशील जाणून घेतला.शहरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी शहरातील स्थानकांचा विविध टप्प्यांतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. मध्य मार्गावरील ठाणे आणि पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली या स्थानकांचा समावेश आहे.खासगी विकासकाच्या मदतीने ही विकासकामे होणार असून, यासाठी देशी कंपन्यांसह विदेशी कंपन्याही मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत. विशेष म्हणजे पुनर्विकासासाठी प्रत्येक स्थानकात २५० ते ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संबंधित कंपनीला स्थानकातील जागा ४५ वर्षांच्या करारावर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाणे स्थानकाजवळील रेल्वेच्या मालकीची मोकळी जागा व्यावसायिक कामासाठी देण्यात येणार आहे.
स्थानकांचा पुनर्विकास जलदगतीने करा
By admin | Published: June 22, 2017 4:43 AM