मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांना अवेळी लोकल आणि गर्दीचा प्रवास करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावरून जाणाऱ्या लोकलचा उन्नत मार्ग तयार करण्यात येत आहे. बºयाच कालावधीपासून संथगतीने सुरू असलेल्या या कामाला गती मिळाली आहे. हार्बर मार्गावरील उन्नत मार्गाचे काम २०२० सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.सध्या कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ७ आणि ८ मार्गावरून सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकांदरम्यान लोकल चालविल्या जातात, तर फलाट १ ते ६ वरून सीएसएमटी ते कल्याण दिशेकडे लोकल धावतात. मात्र, फलाट क्रमांक ७ आणि ८ वरून मालगाडी आणि इतर गाड्यांमुळे उपनगरीय प्रवाशांचा लोकल प्रवास उशिराने होतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी उन्नत मार्गाच्या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे.हार्बर उन्नत मार्गाचे काम वेगात सुरू असून खांब उभारण्यात आले आहेत. यासह इतर पायाभूत कामे करण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास हार्बर मार्गावरील प्रवाशांना इच्छितस्थळी वेळेत पोहोचता येणार आहे.>१२५ कोटींचा खर्च अपेक्षितकुर्ला स्थानकावरील हार्बर मार्गाच्या फलाट क्रमांक ७ आणि ८ जवळ उन्नत मार्ग बनविण्यात येत आहे. उन्नत मार्गाचे काम कसाईवाडा येथून सुरू आहे. या मार्गाचा शेवट सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड येथे म्हणजे, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आहे. या मार्गाची लांबी १.१ किमी आहे. कसाईवाडा येथे तीन फलाटे उभारण्यात येणार आहेत. पादचारी पूल, स्कायवॉक बनविण्यात येणार आहे. यासह येथे ३ हजार ४५० चौमी जागेत दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा प्रदान करण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील उन्नत मार्गाची उभारणी ही कुर्ला स्थानकावरील सीएसएमटी दिशेपासून ते लोकमान्य टिळक स्थानकापर्यंत करण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी १२५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. २०२० सालापर्यंत उन्नत मार्गाची उभारणी होणे अपेक्षित आहे.
हार्बरवरील उन्नत मार्ग उभारणीचे काम वेगात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 6:26 AM