मुंबई :
महानगरातील प्रवाशांच्या जलद आणि सुखकर प्रवासासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यापैकी मेट्रो ४ व मेट्रो ४ अ (वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली - गायमुख) हे मार्ग सर्वात लांब असून या प्रकल्पामुळे दोन शहरे जोडली जाणार आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू असून डेपो व ट्रॅकच्या कामांसाठी एमएमआरडीएने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.
एमएमआरडीएमार्फत प्रगतिपथावर असलेल्या सुमारे ३२.३२ किलोमीटर लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग ४ आणि ४अ प्रकल्पासाठी ठाण्यातील मोघरपाडा येथे डेपोची उभारणी करीत कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. मेट्रो मार्ग - ४ आणि ४ अ (वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली - गायमुख) च्या मोघरपाडा येथे मेट्रो कारडेपोच्या बांधकामासाठी निविदा मागविली होती. एस. इ. डब्ल्यू. आणि व्ही. एस. इ. यांच्या भागीदारीत काम होणार आहे.
४२.२५ हेक्टर जागेत डेपो मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ प्रकल्पासाठी मोघरपाडा येथील सुमारे ४२.२५ हेक्टर जागेत डेपो उभारण्यात येणार आहे. या कारडेपोमध्ये स्टॅबलिंग यार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर आणि प्रशासकीय इमारत, देखभाल व कार्यशाळेच्या इमारती, सहायक सबस्टेशन, स्टाफ क्वार्टर, रस्ता, डेपोला जोडणारा पूल आदी कामे केली जाणार आहेत.
मुंबई मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ ही दोन शहरांना जोडणारी मार्गिका आहे. मुंबईतील वडाळा आणि ठाण्यातील मुख्य भाग जलद जोडण्यासाठी मेट्रो मार्गिकेची स्थापत्य कामे पूर्ण होताच या मार्गिकेचा वापर लवकर करता यावा यासाठी डेपोची उभारणी महत्त्वपूर्ण आहे. डेपोसह ट्रॅकच्या कामांसाठी लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. ही कामे येत्या काही कालावधीत सुरू होतील. - डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए महानगर
मुंबई मेट्रो मार्ग ४ ची स्थापत्य कामे ५८ टक्के , त्यामुळे आता मेट्रो रूळ बसविण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच मुंबई मेट्रोचे काम जलद होण्यासाठी टीम लिडर नियुक्त केले आहेत.