Join us

कुर्ल्यात तीव्र पाणीटंचाई

By admin | Published: September 11, 2015 1:51 AM

धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा पालिकेने शहरात २० टक्के पाणीकपात केली आहे. मात्र कुर्ल्याच्या अनेक भागांत पालिकेने चक्क १०० टक्के पाणीकपात केली आहे.

मुंबई : धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा पालिकेने शहरात २० टक्के पाणीकपात केली आहे. मात्र कुर्ल्याच्या अनेक भागांत पालिकेने चक्क १०० टक्के पाणीकपात केली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी दिवस-रात्र वणवण फिरावे लागत आहे. याबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याने सध्या हे रहिवासी उपोषणाच्या पवित्र्यात आहेत.कुर्ला पश्चिम येथील एल.बी.एस. नगर, नेताजी नगर, राजीव नगर, सुंदर बाग, कमानी, हनुमान मंदिर नगर परिसर, तुळशी बिल्डिंग, साईबाबा मंदिर परिसर, बावडी वस्ती, प्रगती सेवा मंडळ, एलडी चाळ नंबर ९, १०, ११, १२ आणि १३ या परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची मोठी टंचाई आहे. पूर्वी या परिसरात १०० टक्के पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे येथील रहिवाशांना कधीही पाण्याची टंचाई भासली नाही. मात्र १५ दिवसांपासून पालिकेने २० टक्के पाणीकपात केल्यानंतर वॉर्डातील या परिसरांत अचानक पूर्ण पाणी गायब झाले आहे. सध्या या ठिकाणी पाण्याचा थेंबही येत नसल्याने येथील रहिवाशांना रोज एक ते दीड किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यातही हे पाणी दिवसा मिळत नसल्याने घरातील सर्वच कुटुंबीयांना रात्रभर जागून पाणी भरण्याची वेळ आली आहे. या परिसरात १० हजारांपेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. मात्र येथील काही राजकीय भांडणामुळेच परिसरातील पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने शेजारीच असलेल्या परिसरांत सध्या सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र या परिसरामध्ये पाणी येत नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. येथील पाणीप्रश्नाबाबत रहिवाशांनी पालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांना अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांच्याकडून पूर्णपणे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळेच संतापलेल्या रहिवाशांनी पालिकेच्या एल वॉर्डावर मोर्चादेखील काढला होता. या वेळी पालिका अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन येथील रहिवाशांना दिले होते. मात्र चार दिवस उलटल्यानंतरदेखील पाण्याची समस्या जैसे थे असल्याने दोन दिवसांनंतर पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)कुर्ला येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.- प्रशांत सपकाळे, साहाय्यक आयुक्त, एल विभाग