महिनाअखेरपर्यंत सर्व टोल नाक्यांवर होणार फास्टॅग; लाभ न घेतल्यास दुप्पट टोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:59 AM2020-02-17T05:59:54+5:302020-02-17T05:59:59+5:30
राज्याच्या सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर या महिन्याच्या अखेरपर्यंत फास्टॅगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. फास्टॅगची सुविधा सुरू केल्यावर या सुविधेचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागेल, अशी योजना एमएसआरडीसीमार्फत तयार करण्यात येत आहे.
राज्याच्या सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार, सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लागू झाल्यावर जर फास्टॅग सुविधेचा वापर केला नाही, तर वाहनचालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. याबाबत सध्या विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आणि वांद्रे- वरळी सीलिंक मार्गावर फास्टॅग सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांना सीलिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही सूट काही दिवसांपुरतीच असेल.
वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर अशा पाच ठिकाणी मुंबईच्या एंट्री पॉइंटवर टोल नाके आहेत, तर मुंबईमध्ये वांद्रे- वरळी सीलिंक या मार्गावरही टोल नाका आहे. या नाक्यांवर फास्टॅग सेवा सुरू केली आहे. पाच टोल नाक्यांवर अद्याप फास्टॅग सुविधा सुरू केलेली नाही. या नाक्यांवरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. पिक अवरमध्ये रोज या नाक्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. या रांगांना कमी करण्यासाठी सरकारने फास्टॅग सुविधेमार्फत टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.