मुंबई : टोल नाक्यांवर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर भरण्यात येणारा टोल हा फास्टॅगमार्फत भरण्यात यावा, असा निर्णय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएसएआय) घेतला असला, तरी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर अद्याप फास्टॅग उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून मुंबईच्या टोल नाक्यांवर फास्टॅगची सुविधा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर अशा पाच ठिकाणी मुंबईच्या एंट्री पॉइंटवर टोल नाके आहेत. यासह वांद्रे-वर्सोवा सीलिंक या मार्गावरही टोल नाका असून, हे सर्व टोल नाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) आहेत. या सहाही टोल नाक्यांवर अद्याप ‘फास्टॅग’ची सुविधा लागू करण्यात आलेली नाही. ही सुविधा राष्ट्रीय महामार्गावर लागू झाल्यानंतर महिन्याभरात मुंबईच्या टोल नाक्यांवरही लागू करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर बुधवारपासून ही सुविधा सुरू होणार आहे. त्यानुसार एक महिन्यानंतर म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून मुंबईच्या टोल नाक्यांवर फास्टॅग सुविधा सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘वन नेशन, वन टॅग’ ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत फास्टटॅगद्वारे आॅनलाइन टोल भरूनच वाहनांनी टोलनाके ओलांडणे अपेक्षित आहे.‘फास्टॅग’ म्हणजे काय?फास्टॅगचे एक डिजिटल स्टिकर प्रत्येक वाहनावर चिकटविण्यात येणार असून ते संबंधित वाहनधारकाचे बँक खाते किंवा इतर खात्यासोबत लिंक असणार आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. या प्रक्रियेमध्ये संबंधित वाहन टोल नाक्यावरून जाताना तेथील कॅमेऱ्यातील सेंसरमधून स्वयंचलित पद्धतीने वाहनधारकाच्या खात्यातून ही टोलची रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना टोल भरण्यासाठी मोठ्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.