मुंबई: पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोडींची समस्या मुंबईकरांसाठी काही नवी नाही. सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या आणखी तीव्र झाली आहे. या समस्येची तीव्रता काही प्रमाणात कमी करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. कलानगर ते दहिसर या मार्गावर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश न दिल्यास या प्रवासासाठी लागणारं अंतर अडीच तासांवरुन दोन तासांवर येईल, असा अंदाज वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे. संध्याकाळी पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यात आता मेट्रोच्या बांधकामाची भर पडली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत या मार्गावर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची सूचना सोमवारी काढण्यात आली. या नव्या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. माल वाहतूक करणारी वाहनं बऱ्याचदा संथ गतीनं चालतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. पुढील 15 दिवस हा प्रयोग करण्यात येईल आणि त्यानंतर परिस्थितीची आढावा घेतला जाईल. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोडींची समस्या मोठी असल्यानं आम्ही विविध उपाययोजनांचा विचार करत आहोत, असं सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी सांगितलं. 'माल वाहतूक करणारी वाहनं अनेकदा अतिशय संथ गतीनं चालतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. आता पुढील 15 दिवस संध्याकाळी 5 ते रात्री 9 या कालावधीत माल वाहतूक वाहनांना परवानगी नसेल. यामुळे वाहतूक कोंडी किती प्रमाणात कमी होते, याचा आढावा घेतला जाईल. नव्या नियमाचा सकारात्मक परिणाम दिसल्यास दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळच्या वेळेस या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल,' अशी माहिती कुमार यांनी दिली.
कलानगर ते दहिसर चला सरसर; वेस्टर्न हायवेचा प्रवास होणार सुखकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 10:00 AM