मुंबई : मुंबईतील विविध उद्योगांद्वारे उभारला जाणारा सामाजिक दायित्व निधीचा (सीएसआर) वापर करून २० लाख लोकांची सेवा करण्याचे व्रत रोटरी क्लब मुंबईने हाती घेतले आहे. जास्तीत जास्त निधी उभारण्यासाठी क्लबचा रविवारी जुहू येथे सुमारे २०० रोटरीयन्सचा मेळावा पार पडला. यामध्ये रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गोपाल राय मंधानिया यांनी अधिकाधिक उद्योजकांनी या सामाजिक कार्यात पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शन केले.मुंबईतील विविध ८० रोटरी क्लबमधून सुमारे २००हून अधिक रोटरीयन्स या ठिकाणी जमले होते. त्यांच्यामार्फत जून २०१७ पर्यंत मुंबईत सुमारे १ हजार प्रकल्प राबवण्याचा निश्चय या वेळी करण्यात आला. या प्रकल्पांच्या माध्यमांतून २० लाखांहून अधिक लोकांनी विविध सेवा पुरवण्याचे व्रत रोटरीयन्सनी हाती घेतले. मंधानिया यांनी प्रकल्पांसाठी आवश्यक निधी जमा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शिवाय अधिकाधिक दानशूर उद्योजकांना या कार्यात सामील होण्यासाठी रोटरीयन्सनी प्रयत्न करण्यास सांगितले.या महिन्यात रोटरीतर्फे मधुमेह तपासणी शिबिरास सुरुवात होत आहे. वर्षभरात एकूण ३०० मधुमेह नियंत्रण शिबिरे, २५०हून अधिक शौचालयांची उभारणी, ४०० हून अधिक हृदयरोग शस्त्रक्रिया आणि ३०हून अधिक रेल्वे स्थानके दत्तक घेण्याचा रोटरीचा मानस आहे. गेल्या महिन्यात रोटरीने २५ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अडीच हजार रक्तपिशव्या जमा केल्या आहेत. शिवाय १० हजारांहून अधिक झाडे लावून २० रेल्वे स्थानके दत्तक घेतल्याचे रोटरीचे जनसंपर्क प्रमुख विकास उपाध्याय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२० लाख लोकांच्या सेवेचे व्रत
By admin | Published: September 13, 2016 3:12 AM