सत्ताधारी नगरसेवकाचे फेरीवाल्यांविरोधात उपोषण

By admin | Published: June 13, 2017 03:27 AM2017-06-13T03:27:31+5:302017-06-13T03:27:31+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता असताना फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात युवा सेनेला पुढे करून आंदोलन करत रस्त्यावर उतरण्याची

Fasting against the ruling councilor's hawkers | सत्ताधारी नगरसेवकाचे फेरीवाल्यांविरोधात उपोषण

सत्ताधारी नगरसेवकाचे फेरीवाल्यांविरोधात उपोषण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता असताना फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात युवा सेनेला पुढे करून आंदोलन करत रस्त्यावर उतरण्याची नामुष्की त्या पक्षावर ओढवली. आता सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे. त्यांनी तर ठिकठिकाणी पालिका अधिकाऱ्यांना कसा हप्ता मिळतो, याची यादीच जारी केली असून अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर कितपत वचक राहिला आहे, हे स्पष्ट होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर म्हात्रे सहा महिने प्रत्येक सोमवारी ४८ तास साखळी व लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्त्यातून चालताही येत नाही. प्रशासनाकडून हप्तेखोरीत फेरीवाल्यांना कसे अभय मिळते? याचे वास्तव ‘लोकमत’ने ‘रिपोर्टर आॅन दि स्पॉट’च्या माध्यमातून मांडले होते. त्यानंतरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम राहिले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाच रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे. मध्यंतरी युवासेनेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पण काहीही फरक पडला नाही.
दर सोमवारी आठवडा बाजाराच्या वेळी छेडल्या जाणाऱ्या आंदोलनात खुद्द महापौर राजेंद्र देवळेकरही सहभागी झाले. अखेर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले. दर सोमवारी ४८ तास ते उपोषण करतील. महापालिका क्षेत्रात पाच हजारांपेक्षा अधिक फेरीवाले आहेत.
पालिका अधिकारी, कर्मचारी फेरीवाल्याकडून हप्ता घेतात. त्यामुळे कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात पादचारी पुल, स्कायवॉक, पदपथ आणि रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. वर्षभरात एक कोटी पेक्षा जास्त हप्ता घेतला जातो, असा आरोप करत म्हात्रे यांनी कुठे किती हप्ता दिला जातो, याची यादीच जाहीर केली आहे.
म्हात्रे यांनी डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरातील स्कायवॉकखाली उपोषण सुरू केले असून जेथे जेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे तेथील संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांच्या मागील तीन वर्षांतील संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी म्हात्रे यांची आहे. सायंकाळी ६ ते ८ यावेळेत पदपथ आणि रस्ते नागरिकांना चालण्यासाठी मोकळे ठेवावेत, टोपलीतून भाजी विकणाऱ्या महिलांना कारवाईतून वगळण्यात यावे, असे त्यांनी सुचवले आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात महासभेत वारंवार आवाज उठविला; तसेच आंदोलने छेडली, गेल्या १५ दिवसांत शिवसैनिकही आंदोलने करीत आहेत. तरीही दखल घेतली जात नसल्याने उपोषण छेडावे लागल्याचा दावा त्यांनी केला.
विरोधक शांत असल्याने त्यांचेही काम आम्ही सत्ताधारीच करीत आहोत, असा टोला म्हात्रे यांनी लगावला. त्यांच्यासोबत त्यांच्या भावजय तथा माजी नगरसेविका कविता म्हात्रे या देखील उपोषणाला बसल्या आहेत.

फेरीवाल्यांकडून कुठे किती मिळतो हप्ता?
मधुबन टॉकीजचा पदपथ - १५००० रूपये एका आठवडयाचे, पुजा/मधुबन समोर, फुलवाले - १५०० रूपये, कपडेवाले- २००० रूपये.
मधुबन टॉकीज चौक- ३००० रूपये,
दाबेलीवाला- ३००० रूपये, फरसाण- ३००० रूपये, चायनीज- ३००० रूपये, पाणीपुरी- २००० रूपये, मधुबन दुकानदार गल्लीतील- १५०० रूपये, राथ रोडवर रामनगर पर्यंत - १७००० रूपये.
सरबतवाला - ४००० रूपये महिना, चहा व ताकवाला - ४००० रूपये, रामनगर आरटीओ
समोर- २०,००० रूपये महिना.
शिवमंदिर - १०,००० रूपये आठवडयाला.
केळकर रोड- १०,००० रूपये आठवडयाला. केडीएमसीसमोर - ३०,००० रूपये महिना. मधुबनसमोर मुन्ना चप्पलवाला - ५००० रूपये महिना, मानपाडा रोड - ७००० रूपये महिना

Web Title: Fasting against the ruling councilor's hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.