जव्हार : येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर होत असल्याने नवीन पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील एकमेव शासकीय संस्थेतील आदिवासी विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, परंतु शासनाच्या ताठर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे विद्यार्थी रोज संस्थेच्या बाहेर आंदोलन क रत असूनही शिक्षक काही मिळालेले नसल्याने उपोषणाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.विद्यार्थ्यांनी आदिवासी विकासमंत्री, अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे ७ जुलै रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. गेली ५२ वर्षे सुरळीत सुरू असलेली आदिवासी ग्रामीण भागातील ही एकमेव शासकीय संस्था हलविण्याचा शासनाचा हेतू काय? हेच स्पष्ट होत नसल्याने या प्रकरणाला राजकीय रंग असल्याचा आरोप पालकवर्गाने केला आहे. एकही विद्यार्थी जव्हार सोडून अंबरनाथ तालुक्यातील अतिदुर्गम अशा राहटोली गावात शिक्षणासाठी जाणार नाही यासाठीच आमच्या विद्यार्थ्यांवर शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेसाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागतो ही शासनाच्या दृष्टीने शरमेची बाब असल्याचे पालकवर्गाचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे या वादात जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड या १०० टक्के आदिवासी तालुक्यातील डी. एड कॉलेजच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया देखील झाली नाही व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अध्यापन देखील सुरू झाले नसल्याने त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावरच गदा आणण्याचा प्रकार अधिकारी व शासनाच्या ताठर भूमिकेमुळे होत असल्याचे पालक भरत बेंद्रे व चंद्रकांत भसरा यांनी सांगितले. जव्हार येथील संस्थेला प्रशासनाने जे टाळे लावले होते, त्या ठिकाणीच आम्ही पालक व विद्यार्थी यांनीदेखील आज टाळे ठोकून कार्यालयातील एकही दस्ताऐवज बाहेर नेवू न देण्याचा निर्धार केला आहे. (वार्ताहर)
शिक्षणासाठी उपोषणाचा इशारा
By admin | Published: July 04, 2014 12:47 AM