हेल्मेट घालून केला वृद्धेवर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:58 PM2020-03-05T23:58:01+5:302020-03-05T23:58:02+5:30
चोरीच्या उद्देशाने हेल्मेट घालत वृद्धेच्या घरात शिरून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात घडला होता.
मुंबई : चोरीच्या उद्देशाने हेल्मेट घालत वृद्धेच्या घरात शिरून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात घडला होता. या प्रकरणी एकाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने गुरुवारी अटक केली.
अमोल घाग (२३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो जोगेश्वरी पूर्वच्या कोकणनगर परिसरात असलेल्या गणेश सोसायटीमध्ये राहतो. गेल्या वर्षी म्हणजे १३ नोव्हेंबर २०१९ रोजी याच परिसरात राहणारी एक वृद्ध महिला घरी एकटी होती. त्या वेळी घाग स्वत:ची ओळख लपविण्यासाठी डोक्यात हेल्मेट घालून तिच्या घरात शिरला आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला. त्या वेळी वृद्धेने आरडाओरडा करू नये यासाठी त्याने तिच्या गळ्यावर थेट चाकू लावत सोनसाखळी खेचली आणि पसार झाला. या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रँचदेखील या प्रकरणाचा समांतर तपास करीत होती.
त्या दरम्यान या कक्षाचे पोलीस नाईक अमित पाटील यांना घाग हा कोकणनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, हवालदार चंद्रकांत गवेकर, अमित पाटील, सचिन ठोंबरे आणि पथकाने घागला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या आरे कॉलनी परिसरातील अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.