Join us

मागच्या दारातून बंगल्यात शिरत महिलेवर जीवघेणा हल्ला, मालाड पोलिसात घरघड्यावर गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: April 12, 2024 17:58 IST

एका घरगड्याने बंगल्याच्या मागच्या दारातून आत प्रवेश करत एका ४२ वर्षीय महिलेवर हल्ला केला.

मुंबई: साफसफाई करायला ठेवलेल्या एका घरगड्याने बंगल्याच्या मागच्या दारातून आत प्रवेश करत एका ४२ वर्षीय महिलेवर हल्ला केला. ज्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या असून याप्रकरणी मालाड पोलिसांनी महेश धोडी (३८) नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. 

तक्रारदार डेझिरेट पटमेंट (४२) या त्यांची मोठी बहीण डेबीस वॉरस (६०) यांच्यासोबत मालाड पश्चिमच्या ऑर्लेम येथील मेपला हाऊस या त्यांच्या वडिलोपार्जित बंगल्यात राहतात. डेबीस या आजारी असल्याने अंथरुणात आहेत. परिणामी त्या बंगल्याची देखभाल पटमेंटना एकटीला करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी फॉन्सीस नामक व्यक्तीला बंगल्याची साफसफाई करायला ठेवले होते. मात्र त्याचेही वय झाल्याने त्याच्या मदतीसाठी २०२२ मध्ये त्यांनी धोडीला नियुक्त केले. जो फॉन्सीस नसतानाही एकटाच बंगलाची साफसफाई करून जात होता. त्यामुळे पटमेंटच्या तो चांगला ओळखीचा झाला होता. त्या त्याला बाजारात जाऊन भाजी, किराणामाल आणणे अशी अन्य कामेही सांगू लागल्या.

धोडीला तक्रारदार घरच्यासारखीच वागणूक द्यायच्या त्यामुळे तो बंगल्याच्या गॅलरीत झोपायचा. मात्र त्यानंतर त्याने दारू पिऊन कामाला यायला सुरुवात केली आणि तक्रारदारासोबत त्याचे खटके उडू लागले. या प्रकरणी त्यांनी मालाड पोलिसात तक्रार केली होती ज्यावर धोडीने माफी मागितली आणि तक्रारदाराने त्याला कामावरून काढून टाकले नाही. मात्र त्याने पुन्हा दारू पिऊन शिवीगाळ करण्याचा प्रकार सुरू केला आणि त्यांनी त्याला कामावरून काढून टाकले. तसेच त्याच्या विरोधात पोलिसात तक्रारही दिली.

धोडी हा ९ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता पुन्हा दारू पिऊन आल्याने पटमेंट यांनी त्याला घरात घेतले नाही. त्यामुळे बंगल्याच्या मागच्या दरवाज्यातून त्याने घरात प्रवेश करत तक्रारदाराला शिवीगाळ करून तसेच हातापायाने मारहाण केली. मदतीसाठी ओरडणाऱ्या पटमेंटचा आवाज ऐकून स्थानिकांनी पोलिसांना फोन केला आणि मालाड पोलिसांनी धोडीला ताब्यात घेतले. या हल्ल्यामध्ये पटमेंटचे डोळे तसेच पायाला दुखापत झाली आहे. त्यानुसार मालाड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३२३,३२४,४५२,५०४ तसेच ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी