Join us

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; हिंदुजा हॉस्पिटलला उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 8:05 AM

अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे.

मुंबई - मनसे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर ४ अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केला आहे. शिवाजी पार्क परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली. तोंडाला रुमाल बांधून हल्लेखोर आले होते. क्रिकेटच्या स्टंम्पने ही मारहाण करण्यात आली. त्यात संदीप देशपांडे यांनी स्वत:चा बचाव केला त्यानंतर हे हल्लेखोर तिथून पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या देशपांडेवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

सकाळी वॉकला गेले असताना ४ अज्ञातांनी हल्ला केला. संदीप देशपांडे रोज सकाळी वॉकला जातात हे माहिती होते. त्यानुसार प्लॅनिंग करून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोलीस अधिकारी पोहचले आहेत. घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येणार असून हा हल्ला कुणी केला याचा पोलीस शोध घेणार आहेत. 

या हल्ल्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाची स्थिती आहे. घटनेमुळे मनसेचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा राजकीय हल्ला आहे. संदीप देशपांडे मनसेची भूमिका मांडायचे. इतर पक्षांविरोधात भूमिका घ्यायचे त्यामुळे संदीप देशपांडे यांना गप्प करण्यासाठी हा हल्ला केला गेल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे. परंतु ते सुखरुप आहेत. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे. 

दरम्यान, या घटनेबद्दल सांगताना मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी म्हणाले की, नेहमीप्रमाणे वॉकला गेलेले असताना हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. स्टम्पने हा हल्ला केला. तोंडावर रुमाल लावून ते आले होते. संदीप देशपांडे यांना पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही कुणावरही आरोप करणार नाही. परंतु हा हल्ला करणाऱ्याला शोधणार नक्की असा इशारा त्यांनी दिला आहे. 

कोण आहेत संदीप देशपांडे?संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस असून पक्षाचे प्रवक्तेही आहेत. त्याचसोबत शिवाजी पार्क परिसरातील ते मनसेचे माजी नगरसेवक आहेत. राज ठाकरेंचा विश्वासू चेहरा म्हणून संदीप देशपांडे यांच्याकडे पाहिले जाते.  

टॅग्स :संदीप देशपांडेमनसे