वडाळ्यातील दुकानदारावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:35 AM2017-08-12T06:35:18+5:302017-08-12T06:35:18+5:30
वडाळ्यातील नॅशनल मार्केटमधील दुकानाच्या वादातून, काकाने पुतण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे.
मुंबई : वडाळ्यातील नॅशनल मार्केटमधील दुकानाच्या वादातून, काकाने पुतण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. या हल्ल्यात नाजीम अब्दुल गफूर शेख गंभीर जखमी झाला असून, आरोपी लियाकत हाशम शेख उर्फ बाबू चिंधी या आरोपी काकाला पोलिसांनी अटक केली आहे. नाजीम याने शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला.
नाजीमने दिलेल्या माहितीनुसार, वडाळ्यातील नॅशनल मार्केटमधील दुकानाचे मालकी हक्क वडिलांकडे होते. मात्र, वडिलांच्या मृत्यूनंतर काकाने दुकान चालविण्यास घेतले. सुरुवातीला वेळेत भाडे देणारा काका काही दिवसांनंतर भाडे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यानंतर, जाब विचारण्यास गेले असता, दुकानाचा ताबा देण्यास नकार देत, काकाने जिवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात वडाळ्याच्या आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळेच रागाच्या भरात काकाने मुंब्रा येथे जीवघेणा हल्ला केला. त्यास मुंब्रा पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र, हीच कारवाई आर. ए. किडवाई मार्ग पोलिसांनी केली असती, तर जीवघेणा हल्ला झाला नसता, असा नाजीमचा आरोप आहे.
..तर आईसोबत आत्महत्या करू
दुकानाच्या मालकीहक्काची सर्व कागदपत्रे असतानाही, दुकानात जाण्यापासून पोलिसांकडून मज्जाव केला जात असल्याचा आरोप नाजीमने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात, आर. ए. किडवाई मार्ग पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केल्याचे नाजीमने म्हटले आहे.
या प्रकरणी न्याय मिळाला नाही, तर रोजगाराअभावी विधवा आईसोबत आत्महत्या करण्याचा इशारा नाजीमने पत्रकार परिषदेत दिला आहे.