जीवघेणी वाहतूक कोंडी तरीही भरावा लागतोय टोल
By admin | Published: September 13, 2014 01:12 AM2014-09-13T01:12:10+5:302014-09-13T01:12:10+5:30
राज्यातील व देशातील वाहनांना मुंबईत जाण्यासाठी भिवंडी शहर व तालुक्यातून जावे लागते. ही दळणवळणाची सोय शेकडो वर्षापासून सुरू आहे.
पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
राज्यातील व देशातील वाहनांना मुंबईत जाण्यासाठी भिवंडी शहर व तालुक्यातून जावे लागते. ही दळणवळणाची सोय शेकडो वर्षापासून सुरू आहे.मात्र शहरवासीयांच्या व ग्रामस्थांच्या जीवनावर याचा कोणताही परिणाम होऊ नये असा दूरगामी विचार भिवंडी पूर्व, पश्चिम व ग्रामिण विधानसभेच्या आमदारांनी तसेच जिल्हा नियोजन समितीने न केल्याने या परिसरांतील नागरिकांना वाहतूककोंडी सोसूननही टोल भरून खिशाला चाट सोसावे लागत आहे.
भिवंडी शहर व ग्रामिण परिसरांत दिवसेंदिवस वाढत्या उद्योगधंद्याने प्रगती होत आहे.परंतु नियोजन नसल्याने दररोज या परिसरांतून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांचा ताण येथील समाज जीवनावर पडत आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने परिसरांत दळणवळणासाठी रस्त्याचे नियोजन करण्यापेक्षा काही राजकारण्यांनी व्यावसायिक संधी म्हणून या बाबीकडे पाहिले आणि जेथे मिळेल तेथे टोल मार्ग सुरू केले. त्यामुळे शहर व परिसरांतील नागरिकांना येताना व जाताना टोल द्यावा लागत आहे. कशेळी ते अंजूरफाटा या मार्गाचे रूंदीकरण होऊनही गटारे साफ न झाल्याने व चिखल साचल्याने, किनाऱ्यावर भंगार वाहने पार्क करणे आदि कारणाने वाहन चालकास वाहतूककोंडीचा सामना कराना लागतो. तसेच टोलधारकाच्या नवीन पूलावर लाईटची व्यवस्था नसल्यान्ो दुचाकीचालकांना चाचपडत जावे लागते. सिमेंटचे रस्ते बनवून देखील रस्त्यात खड्डे झालेत. माणकोली ते खारबाव या महामार्गाच्या पट्ट्याची टोलवसूली सुरू असली तरी अंजूरफाटा येथील रेल्वेपूलाची रूंदी न वाढविल्याने झालेल्या वाहतूककोंडीचा सामना सर्वांना करावा लागतो. इंग्रजांच्या काळात बांधलेल्या दुर्गाडी शेजारील पूल किमान तीन पिढ्यांनी वापरला.
परंतु नवीन पूल अरूंद बांधल्याने नेहमी होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनधारकांसह सर्वसामान्य माणूस देखील जेरीस आला आहे. तरी देखील भिवंडी-कल्याण मार्गावरील गोवे नाक्यावर टोल वसूली सुरू आहेच. भिवंडी-वाडा मार्गावर रस्त्याचे रूंदीकरण न करता तेथे सिमेंटचा रस्ता बनविला तरीही त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शेलार ते आंबाडी या रस्त्यासाठी टोल आकारला जात असताना कामवारी नदीवरील पुलावर येणाऱ्या जड वहानांच्या भाराकडे दुर्लक्ष होत आहे. हा पुल पडल्यास पर्यायी मार्ग नाही. भिवंडीच्या चारही बाजूच्या रस्त्यांना वेढलेल्या या टोलनाक्यांमुळे शहरवासीयांना व ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड पडतोच परंतु वाहतूक कोंडीने होणाऱ्या प्रदूषणाचा देखील त्रास सहन करावा लागतो.
या बाबत कोल्हापूर प्रमाणे कोणताही राजकीय पुढारी टोलनाक्यां विरोधात आवाज करीत नाही. काहींनी त्याविरोधात डरकाळी फोडण्याऐवजी ठेकेदारी सुरू केली. त्यामुळे मतदारराजा नाराज असून त्याचा फटका राजकीय पक्षांना बसणार आहे. (प्रतिनीधी)