Join us

माहिममधील मताधिक्य मनसेसाठी धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:27 AM

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली.

- गौरीशंकर घाळेमुंबई : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली. ज्या भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभावक्षेत्र असल्याचे मानले जाते तिथूनच युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मते आणि मताधिक्य मिळाले. त्यामुळे ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत युतीविरोधात मतदान करण्याचे आवाहन दादर, माहिमकरांनी फारसे मनावर घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.माहिम विधानसभा क्षेत्रात दादर, माहिम, माटुंगा, प्रभादेवी आदी परिसर येतो. पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. मनसेच्या स्थापनेनंतर त्याला धक्का बसला. २०१४ साली युतीच्या उमेदवाराला ७४ हजार तर काँग्रेस उमेदवाराला २७ हजार मते मिळाली. दादरमधून ४७ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने गेल्यावेळी राहुल शेवाळे यांचा मार्ग सुकर झाला. यंदा मोदी - शहा यांच्याविरोधात मनसेने रान उठविले होते. राज यांच्या सभांची मोठी चर्चाही झाली. त्यामुळे माहिममध्ये मनसेला पुन्हा एकदा चांगले दिन येतील; आणि त्याचा थेट फटका युतीच्या उमेदवाराला होईल, असा अंदाज व्यक्त केला गेला. प्रत्यक्ष निकालांनी मात्र हा अंदाज खोटा ठरविला आहे. यंदा येथून युतीच्या उमेदवाराला ९१ हजार तर काँग्रेसला ३८ हजार मते मिळाली. एकट्या दादरमध्ये ५३ हजारांचे मताधिक्य मिळाले. विशेष म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत सुमारे सहा हजारांची वाढ आहे.राज ठाकरे यांनी युतीविरोधी भूमिका मांडल्यानंतर मनसैनिकांनी काँग्रेस उमेदवारासाठी प्रचारही केला. मनसे नेते संदीप देशपांडे स्वत: काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या शिवाजी पार्क येथील मॉर्निंग वॉक प्रचारात सहभागी झाल्याचे फोटो झळकले होते. मात्र, मनसे समर्थक मतदार काँग्रेसला मत देण्याची शक्यता नाही. त्यामुळे नोटाची टूम पुढे करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांकडून नोटाचा प्रचार झाला. त्यामुळे अनेकांनी ‘नोटा’चा पर्याय निवडल्याचा दावा मतदानाच्या दिवशी मनसेच्या गोटातून करण्यात येत होता. त्याचा काहीसा परिणाम म्हणून माहिम विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ३१५० मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. युतीला मिळालेल्या एकूण मताधिक्याचा विचार करता हा आकडा अगदीच क्षुल्लक मानला जात आहे. मनसेने पुढाकार घेतला नसता तरी दीड-दोन हजार लोकांनी नोटाचे बटन दाबले असते. माहिम मतदारसंघातच राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे. शिवाय, तुलनेत इथे मनसेचा अधिक प्रभाव असल्याचे मानले जाते. तिथेच राज यांच्या झंझावाताकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने हा निकाल मनसेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. २०१४ साली शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविली. तेंव्हा भाजपला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार वगैरे मंडळी तत्परतेने ‘मातोश्री’वर दाखल झाले. यापुढील निवडणुकीतही युती कायम राहणार असल्याचा दावा केला. त्यामुळे मनसेला ही विधानसभा परत मिळविण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे.>विधानसभेवर काय परिणाम...लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी युतीविरोधात प्रचार केला़ त्याचा फारसा परिणाम लोकसभा मतदारांवर झाला नाही़ त्यामुळे विधानसभेला मनसेची जादु चालणार नाही, असे तर्त चित्र आहे़दादरमध्ये राज ठाकरे यांचे घर आहे़ तेथील नागरिकांनी राज यांच्या झंझावाताकडे दुर्लक्ष केल्याने विधानसभेला येथील मराठी मतांचे विभाजन होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे़ याचा फायदा निश्चितच शिवसेना भाजप युतीला होईल़युतीचे सहाही उमेदवार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह आशिष शेलार, विनोद तावडेव इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली़ याचा अर्थ युतीची ताकद विधानसभेला अजून वाढण्याची शक्यता आहे़>दादरने साथ दिली तर दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. अन्यथा काँग्रेसला लॉटरी लागते, हे येथील राजकीय गृहीतक आहे. २००९ साली मनसेच्या मतविभागणीमुळे शिवसेना उमेदवाराला केवळ ४४ हजार मते पडल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. २०१४ साली मात्र शिवसेनेने पुन्हा एकदा या भागात आपले वर्चस्व निर्माण केले.

टॅग्स :राहुल शेवाळेमुंबई दक्षिण मध्य