महिला सांगणार वडिलांची कीर्ती..!
By admin | Published: March 9, 2017 03:37 AM2017-03-09T03:37:50+5:302017-03-09T03:37:50+5:30
आजची स्त्री विविध क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी असताना, चित्रपटक्षेत्रसुद्धा त्याला अपवाद असणे शक्य नाही. या क्षेत्रातही पडद्यामागे राहून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या
- राज चिंचणकर, मुंबई
आजची स्त्री विविध क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी असताना, चित्रपटक्षेत्रसुद्धा त्याला अपवाद असणे शक्य नाही. या क्षेत्रातही पडद्यामागे राहून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही महिला आहेत. याच मांदियाळीत शारदा खरात यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास घेऊन, त्यांच्या शिवम् सहेली परिवारातर्फे ‘माणूस - एक माती’ हा वडिलांना केंद्रस्थानी ठेवणारा चित्रपट बनवला आहे. एवढेच नव्हे, तर महिलांचे संघटन करून या चित्रपटाच्या वितरणाची संपूर्ण जबाबदारीसुद्धा या महिला शक्तीने पेलली आहे. या चित्रपटामागे महिलांची ताकद उभी असली, तरी या चित्रपटात वडील ही व्यक्तिरेखा मध्यवर्ती आहे. परिणामी, या कलाकृतीद्वारे या महिला वडिलांची कीर्ती सांगणार असून, २४ मार्च रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात गणेश यादव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महिलांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सक्षमीकरणासाठी आमची ही संकल्पना मोठी भूमिका निभावणार असून, या चित्रपटाद्वारे समाजाला एक चांगला विचार आम्ही देणार आहोत, असे मत या पार्श्वभूमीवर बोलताना शारदा खरात मांडतात.
मी आहे तो आई-वडिलांमुळेच...
अनेक चित्रपट आई या व्यक्तिरेखेवर बेतलेले असतात; परंतु वडिलांना फारसे कुणी लक्षात घेतलेले नाही. जगातले नि:स्वार्थ नाते हे आई-वडिलांचे असते. आज मी जो कोणी आहे तो माझ्या आई-वडिलांमुळेच आहे, अशा भावना या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना अभिनेता सिद्धार्थ जाधव व्यक्त करतो.