मुंबई : मुंबई शहरात दहा मतदारसंघाचा समावेश होत असून निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २५ लाख ३४ हजार ८१८ मतदार १० आमदारांना निवडून देणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आपला आमदार निवडून यावा यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करतील.
मुंबई शहरातील मतदारसंघांत एकूण २४४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून सर्वाधिक मतदार माहीम आणि सायन कोळीवाडा मतदारसंघात आहेत. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला त्याच्या परिसरातील मतदार हे मतदान केंद्रावर कसे आणता येतील, याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. जुन्या मतदार यादीच्या साहाय्याने कोणत्या परिसरात पक्षाचे किती मतदान आहे, त्यानुसार त्या परिसरावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
६,३४० दिव्यांग मतदार
निवडणूक आयोगाने काही वर्षापासून दिव्यांग मतदाराची वेगळी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई शहरातील मतदार संघात एकूण ६,३४० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक १,०२३ दिव्यांग मतदार सायन कोळीवाडा मतदारसंघात आहेत. तर सर्वांत कमी ३७१ भायखळा मतदारसंघात आहेत. निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी केंद्रावर विशेष सुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच घरातून मतदान करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सुविधा सुरू केली आहे. सध्या सर्वांची मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.