११६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’बंद; गोरेगाव, विक्रोळी, शिवडीत स्ट्राँगरूम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:36 AM2024-05-21T09:36:11+5:302024-05-21T09:39:29+5:30
मुंबईत ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदार आहेत. तत्पूर्वी उपनगरांत नियुक्त २२ हजार ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई : उपनगरांतील चार लोकसभा मतदारसंघात ८७ उमेदवार आणि मुंबई शहर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत २९ उमेदवार असे एकूण ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी सोमवारी ९ हजार ९०२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. या सर्व मतदारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले असून, गोरेगाव, विक्रोळी आणि शिवडी येथील स्ट्राँगरूममध्ये ४ जूनपर्यंत ही यंत्रे त्रिस्तरीय सुरक्षिततेत ठेवण्यात आली आहेत.
मुंबईत ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदार आहेत. तत्पूर्वी उपनगरांत नियुक्त २२ हजार ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे, तर दोन हजार ७३५ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी आणि मुंबई शहरात ५४३ ज्येष्ठ नागरिक आणि ९ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जेथे १६ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत, तिथे दोन ईव्हीएम युनिट ठेवण्यात आली होती.
मतमोजणी कुठे?
१) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची मतमोजणी नेस्को, गोरेगाव येथे होईल.
२) उर्वरित मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होईल.
३) दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील मतमोजणी नवीन शिवडी वेअरहाऊस, सीएफएस एरिया, शिवडी येथे होणार आहे.
सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर -
१) निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि मुंबई पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षा स्ट्राँगरूमला दिली जाते.
२) स्ट्राँगरूममध्ये इतर कोणत्याही लोकांना प्रवेश बंदी असते. राजपत्रित अधिकारी त्याची पाहणी करतात.
३) सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. स्ट्राँगरूममधील ईव्हीएम नेण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, अग्निसुरक्षा उपाययोजना, स्ट्राँग रूममधील अधिकृत रजिस्टर्सची देखभाल याची माहिती घेतली जाते.