रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरमधील रिव्हॅल्यूएशनच्या निकालाला विलंब झाल्यामुळे मुंबई विद्यापीठातील तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. संपूर्ण वर्षच नव्हे तर त्याकरिता भरलेली एक ते पावणेदोन लाख फीदेखील वाया जाणार आहे. कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने अखेर या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाविरोधात उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
रिव्हॅल्युएशनच्या निकालाला विलंब झाल्याने या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षात ढकलण्यात आले. परंतु, निकालानंतर अनुत्तीर्ण झाल्याचे कारण देत त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षालाच प्रवेश घेण्यास सांगण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गैरकारभारामुळे आपले वर्ष तर वाया जाणार आहेच, शिवाय त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याची परतफेड म्हणून विद्यापीठाने पुनर्परीक्षा घेऊन त्या निकालाच्या आधारे दुसऱ्या वर्षाचा प्रवेश कायम करायचा की नाही, हे ठरवावे, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. डिसेंबर, २०२२ मध्ये प्रवेश घेतलेले हे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाच्या चौथ्या सेमिस्टर परीक्षा देत आहेत.
परीक्षेच्या तोंडावरच त्यांचे पहिल्या वर्षातील प्रथम आणि द्वितीय सेमीस्टरच्या रिव्हॅल्युएशनचे निकाल येऊ लागले आहेत. हे निकाल सात ते आठ महिन्यांच्या विलंबाने येत आहेत. त्यात जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत, त्यांचे संपूर्ण दुसरे वर्ष अडचणीत येणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
आर्थिक भुर्दंड
दुसरे वर्ष वाया जाण्याबरोबरच त्याकरिता भरलेले शुल्क, परीक्षेचे शुल्क, रिव्हॅल्युएशन, फोटोकॉपीकरिता भरलेले शुल्क हे सगळेच वाया जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांवर पडणारा हा आर्थिक भुर्दंडही मोठा आहे.
२०२२-२३च्या बॅचचे प्रवेश डिसेंबरपर्यंत लांबले
अभियांत्रिकीचे प्रवेश एरवी जून-जुलैमध्ये होऊन ऑगस्टपर्यंत त्यांचे कॉलेज सुरू होते. परंतु, २०२२-२३च्या या बॅचचे प्रवेश डिसेंबरपर्यंत लांबले. जानेवारी, २०२३ मध्ये त्यांचे कॉलेज सुरू होत नाही तोच, फेब्रुवारीत त्यांची पहिल्या सेमिस्टरची परीक्षा सुरू झाली.
प्रत्येक सेमिस्टरसाठी किमान सहा महिने तरी अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यात या परीक्षेचा निकाल तब्बल ११० दिवसांनी म्हणजे जून, २०२३ मध्ये लागला. शिकवायला पुरेसा वेळच न मिळाल्याने परीक्षेत हजारो मुले अनुत्तीर्ण झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांची दुसऱ्या सेमीस्टरची परीक्षा सुरू होती.
ही परीक्षा संपत नाही तोच चार दिवसांत (४ जुलैला) पहिल्या सेमीस्टरची रिएक्झाम सुरू झाली. त्यानंतर लगेचच २८ ऑगस्टला दुसऱ्या सेमीस्टरचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार मुंबई युनिर्व्हसिटी कॉलेज टिचर्स असोसिएशनचे महासचिव सुभाष आठवले यांनी केली.