राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या नागरिकांसाठीच सध्या लोकलसेवेची सुविधा उपलब्ध आहे. अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद आहे; त्यामुळे या प्रवाशांचा सगळा भार प्रामुख्याने बेस्ट बसवर पडत आहे. सर्वसामान्य प्रवासी बेस्ट बस सेवेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. पण सुरुवातीच्या थांब्यावर बसमध्ये प्रवासी भरल्यावर, गर्दी नको म्हणून अनेक बस पुढील थांब्यांवर न थांबता सुसाट पुढच्या मार्गाला लागलेल्या दिसतात. त्यामुळे मधल्या बसथांब्यांवरील प्रवाशांच्या नशिबी दीर्घकाळ ‘थांबा’च येत असल्याचे चित्र आहे.
मधल्या बसथांब्यावरील प्रवाशांनी बससाठी किती वेळ ताटकळत राहायचे, याला आता काही मर्यादा उरली नसल्याचे विदारक दृश्य अनेक बसथांब्यांवर दिसून येत आहे. अनलॉकच्या सुधारित नियमांनुसार बसमध्ये एका सीटवर दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे आणि उभ्याने प्रवासाला अद्याप परवानगी नाही. त्यामुळे सुरुवातीच्या थांब्यावरून बस भरून आली की, ती मधल्या थांब्यांवर थांबतच नाही. अशावेळी केवळ थांब्यावर हतबलतेने उभे राहून, थेट पळणाऱ्या बसेसकडे पाहण्याशिवाय प्रवाशांकडे गत्यंतर उरत नाही. काही मिनिटांपासून एक-दीड तासापर्यंत बसथांब्यांवर असे ताटकळणारे प्रवासी सध्या सर्वच थांब्यांवर पाहायला मिळत आहेत.
अत्यावश्यक सेवेत नसलेल्या; परंतु काही तातडीच्या आवश्यक कामांसाठी किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे यात प्रामुख्याने हाल होत आहेत. इतके दिवस राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) बसची उपलब्ध असलेली सुविधाही आता जवळजवळ काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट बसवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
* प्रवासी, वाहकांमध्ये वाद
एक सीटवर दोन प्रवासी आणि उभ्या प्रवाशांना मज्जाव, हे सूत्र काही बसवाहक काटेकोरपणे पाळत आहेत. पण काही बसमार्गांवर मात्र बसमध्ये उभे प्रवासी घेतले जात असल्याचे दिसून येते. या विरोधाभासामुळे प्रवासी वाहकांशी हुज्जत घालताना दिसून येत आहेत.
--------------------------------------------------------------------