माझ्या सर्व यशाचे श्रेय वडिलांना: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:04 AM2017-08-01T03:04:24+5:302017-08-01T03:04:24+5:30
‘वडील हे माझे सर्वात जवळचे मित्र होते. ते प्रेमाने, मायेने बोलत. त्यांनी माझ्या गुणांना वाव दिला. त्यामुळे माझ्या सर्व यशाचे श्रेय मी त्यांना देईन,’ असे प्रतिपादन करत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांवर प्रेम करण्याचा सल्ला दिला.
मुंबई : ‘वडील हे माझे सर्वात जवळचे मित्र होते. ते प्रेमाने, मायेने बोलत. त्यांनी माझ्या गुणांना वाव दिला. त्यामुळे माझ्या सर्व यशाचे श्रेय मी त्यांना देईन,’ असे प्रतिपादन करत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांवर प्रेम करण्याचा सल्ला दिला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वरगंधार’ आणि ‘जीवनगाणी’ संस्थेने विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवशाहीर सन्मान सोहळा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी भारतरत्न सचिन तेंडुलकर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष किशोर रांगणेकर उपस्थित होते.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, ‘आपला वारसा मुलांकडे द्या. कोणाचा द्वेष, तिरस्कार करू नका. आपण सर्व एक आहोत. मला विरोधी पक्ष हा शब्द आवडत नाही. प्रत्येकाने माझे सरकार आहे, हा भाव ठेवला पाहिजे.’ दरम्यान, या वेळी सचिन तेंडुलकरच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हे दुर्दैवी आहे...
‘राजकारणात श्रीमंत झाले, ते बाबासाहेबांवर बोटे उगारत आहेत. इतिहासाला जातीपातीची लेबले लावली जात आहेत. बाबासाहेबांना या वयातही राज्यात पोलीस संरक्षणात फिरावे लागते, हे दुर्दैवी आहे. यापुढे बाबासाहेबांना पोलीस संरक्षणात फिरण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आहे,’ असेही राज ठाकरे म्हणाले.
‘महाराष्ट्र भूषण’ असणाºया बाबासाहेब पुरंदरे यांच्या सन्मानासाठी ‘भारतरत्न’ स्वत: आले ही मोठी बाब आहे. बाबासाहेबांनी महाराष्ट्राला सोप्या पद्धतीने इतिहास समजावून सांगितला. एका मुलाखतीप्रसंगी मी त्यांना विचारले होते, ‘तुम्हाला पेशव्यांपेक्षा शिवाजी महाराजांचा इतिहास का लिहावासा वाटतो?’ त्यावर ‘पेशव्यांनी केलेल्या चुका सांगण्यापेक्षा, महाराजांनी केलेल्या अचूक गोष्टी सांगणे मला योग्य वाटले,’ असे उत्तर त्यांनी दिले.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
लहानपणापासूनच बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव कानी येत होते, पण ते कोण? हे तेव्हा कळण्याचे वय नव्हते. माझ्या वडिलांकडूनही नेहमी त्यांचा उल्लेख येत असे. माझ्या आयुष्यात इतिहास सुरू झाला, तो शिवाजी महाराजांपासून आणि क्रिकेट सुरू झाले ते शिवाजी पार्कपासून. आज बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले.
- सचिन तेंडुलकर