मुंबई : कॅटरिंग व्यवसायाच्या बहाण्याने व्यावसायिकांना गंडा घालणाºया पिता-पुत्राने अटकेनंतर आजारपणाचे नाटक केले. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तेथून पळ काढला. अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोघांनाही कांजूर पोलिसांंनी बेड्या ठोकल्या आहेत. ओमप्रकाश देवदास खन्ना (६२), तुषार ओमप्रकाश खन्ना (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे काही कागदपत्रे सापडली. त्यामध्ये अनेक कॅटरिंग व्यावसायिकांना अशा प्रकारे गंडा घातल्याची माहिती समोर आली असून दोघांचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांजूरमार्ग परिसरात राहणारे भूषण मसुरकर (४३) यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. २०१४ ते २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत खन्ना पिता-पुत्राने त्यांच्याकडून कॅटरिंगच्या कामासाठी भाड्याने पितळेची भांडी घेतली. मात्र नंतर ही भांडी परस्पर विकून दोघेही पसार झाले. याबाबत शुक्रवारी मसुरकर यांनी कांजूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार कांजूरमार्ग पोलिसांनी शनिवारी शिताफीने दोघांना बेड्या ठोकल्या.कोठडीत जाण्याच्या भीतीने ओमप्रकाशने शनिवारी छातीत दुखत असल्याचे नाटक केले. रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मुलगाही सोबत हवा, अशी विनंती केली. पोलिसांनीही विश्वास ठेवून त्यांना विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात नेले. तेथे पोलिसांची नजर चुकवून दोघांनीही पळ काढला.
रुग्णालयातून पळालेले पिता-पुत्र पुन्हा अटकेत, कांजूर पोलिसांनी पहाटे केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 4:56 AM