एमपीएससीमध्ये वडिलांना अपयश, पण मुलगा तहसीलदार, बालपण होते खडतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:42 AM2020-07-09T01:42:30+5:302020-07-09T01:43:02+5:30
मुलाने स्वप्न पूर्ण केल्याने वडिलांच्या आनंदाला उरला नाही पारावार
मुंबई : मुंबईकर अभिषेक किरण नलावडे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याची तहसीलदार पदावर निवड झाली आहे. बालपण काहीसे खडतर गेलेला अभिषेक नंतर मात्र अभ्यासात सातत्याने प्रगती करीत राहिला. अभिषेकचे वडील किरण सूर्यकांत नलावडे हे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला असून आई शोभा या गृहिणी आहेत. अभिषेकचे वडील किरण यांनी नव्वदच्या दशकात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. पण त्यांना यशाने हुलकावणी दिली होती. अभिषेकने माझे स्वप्न पूर्ण केल्याने किरण यांना आनंदाश्रू आले. अर्थशास्त्र विषयातही अभिषेकला विशेष रुची आहे.
जुन्नर तालुक्यातील धोलवड गावचे रहिवासी असलेले नलावडे कुटुंबीय गेली पंचवीस वर्षे येथे राहत आहेत. नलावडे परिवाराची धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि लोककला क्षेत्रांमध्ये नेहमीच ख्याती राहिली आहे. अभिषेकने या परिवाराच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अभिषेकच्या या देदिप्यमान यशाने धोलवड गावातही आनंद झाला आहे.
गावकऱ्यांनाही आनंद
अभिषेक हा आपल्या गावातील पहिला मुलगा शासकीय सेवेत एवढा उच्चपदावर विराजमान झाल्याने सर्व अबालवृद्धांमध्ये आनंदाबरोबरच अभिमानाची भावना आहे. अभिषेकने परिवाराच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.