बाप रे बाप! भाभा रुग्णालयात निघाला फडीचा साप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:46 PM2023-07-21T13:46:05+5:302023-07-21T13:48:18+5:30
ओपीडीत सापासह आढळली पिल्ले, एकाला पकडण्यात यश
श्रीकांत जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुग्णांनी खच्च भरलेल्या बाह्य रुग्ण विभागात एक मोठा साप आणि त्याच्या पिल्लांची जोडी आढळल्याने भाभा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. सर्पमित्रांनी केवळ एका पिल्लाला पकडले असून, इतर सापांचा वावर रुग्णालयात आहे. त्यामुळे येथील सर्वांना सापांच्या भीतीखाली वावरावे लागत आहे.
उपनगरातील मोठे रुग्णालय म्हणून वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. येथील बाह्य रुग्ण विभागात सकाळपासून प्रचंड गर्दी असते. शिवाय अपघात कक्षातही अनेक रुग्ण येत असतात. पावसाळ्यात रुग्णांची संख्या अधिक असते. दोन सोमवारी बाह्य रुग्ण विभागात प्रसूतीपूर्व कक्ष तपासणी कक्षाजवळ एका महिला कर्मचाऱ्याला एक मोठा साप आढळून आला. तेव्हा ओपीडी विभाग रुग्णांनी खच्च भरला होता. कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर सर्पमित्राला बोलाविले. दरम्यान, सर्पमित्रांनी ओपीडी परिसरात शोध घेतला असता. त्यांना सापाचे एक पिल्लू आढळले. या एका पिल्लाला ताब्यात घेतइतर दोन सापांचा शोध सुरू आहे.
रुग्णालयात सापांचा वावर
एकूण तीनपैकी सापाच्या एका पिल्लालाच पकडले असून इतर दोन सापांचा वावर भाभा रुग्णालयात आहे. सध्या या रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून येथील ओपीडीमधील भंगार सामानात हे साप दडून बसले असावेत असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कर्मचारी, रुग्ण सापांच्या भीतीखाली
या घटनेला दोन-तीन दिवस झाले तरी अद्याप इतर सापांचा शोध लागलेला नाही. मोठा साप अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे येथील कर्मचारी आणि रुग्ण सापाची भीती बाळगून आहेत. भरपावसात कुठून साप निघेल याची चर्चा येथे असते.
रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तेथे अनेक अडगळीच्या खोल्या आहेत. त्यात भंगार जमा केले असून स्वच्छतेचा अभाव आहे. सर्पमित्रांनी एका सापाला ताब्यात घेतले असून इतरांचाही शोध घेत आहेत. रुग्णालयाचे कर्मचारी दक्ष आहेत.
सर्वांनी काळजी घ्यावी, असे भाभा रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.