Join us

बाबांचा मित्र समजून ठेवला विश्वास अन् फसली; पैसे आल्याचे संदेशही निघाले बनावट

By मनीषा म्हात्रे | Published: June 07, 2023 8:50 AM

चेंबूरमधील घटना.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हॅलो, मी तुझ्या बाबांचा मित्र बोलतोय... बाबांना पैसे पाठवायचे होते. पण त्यांच्या अकाउंटला प्रॉब्लेम झाला आहे. मी तुला पैसे पाठवितो. तू नंतर बाबांना दे... असे गोड बोलून सायबर ठगाने एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. आपली फसवणूक होत आहे, याची पुसटशी कल्पना न आल्याने तिनेही वडिलांचा मित्र समजून त्याला होकार दिला आणि हाच होकार तिला भलताच महागात पडला. सायबर ठगाने खात्यात पैसे पाठविण्याच्या नावाखाली या तरुणीचे खातेच रिकामी केले आहे. विशेष म्हणजे, सायबर ठगाने पैसे खात्यात क्रेडिट होत असल्याचे संदेश पाठवून तरुणीला हा गंडा घातला असून, याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चेंबूर परिसरात राहणारी २२ वर्षीय रिद्धी खासगी कंपनीत नोकरीला आहे. ४ जून रोजी दुपारच्या सुमारास घरात असताना एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून बाबांचा मित्र बोलत असल्याचे सांगितले. तो अनिल शर्मा बोलत असल्याचे सांगून, वडिलांना १२ हजार पाठवायचे होते. मात्र, बँकेचा प्रॉब्लेम असल्याने तुझ्या अकाउंटवर पाठवितो. तू ते वडिलांना पाठव, असे सांगितले. वडिलांचा मित्र म्हणून तिने विश्वास ठेवून पैसे पाठविण्यास सांगितले. सुरुवातीला गुगल पेवर १० हजार रुपये आल्याचा टेक्स्ट मेसेज आला. 

पुढे, उर्वरित दोन हजार पाठवीत असल्याचे सांगून २० हजार रुपयांचा मेसेज आला. कॉलधारकाने २ हजारांऐवजी चुकून २०  हजार पाठविल्याचे सांगून उर्वरित पैसे परत पाठविण्यास सांगितले. तरुणीने विश्वास ठेवून १८ हजार रुपये पाठविले. पुढे तिच्या बँक खात्यात २५ हजार आल्याचा संदेश आला. शर्माने पुन्हा चुकून पैसे पाठविल्याचे सांगून तरुणीला ते पुन्हा पाठविण्यास सांगितले. तिने पुन्हा २५ हजार पाठविले. पुन्हा अशाच प्रकारे खात्यात चुकून पैसे आल्याचे सांगत, तरुणीच्या खात्यातील ९३ हजार रुपयांवर हात साफ केला.

पैसे आले नाहीत तर गेले...

पुढे, बँक लिमिट संपल्याचे समजताच तरुणीला धक्का बसला. केलेल्या चौकशीत खात्यातून ९३ हजार रुपये गेले होते. तिने तत्काळ याबाबत वडिलांना विचारताच कोणीही पैसे पाठविणार नसल्याचे सांगितले. तसेच अनिल शर्मा नावाच्या व्यक्तीलाही ओळखत नसल्याचे सांगितले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

 

टॅग्स :गुन्हेगारी