दोन महिन्यांपासून वडिलांचा पत्ता नाही, तरी तक्रार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:06 IST2024-12-13T10:05:51+5:302024-12-13T10:06:21+5:30
शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अंध वृद्धाच्या नातलगांचा लागला शोध

दोन महिन्यांपासून वडिलांचा पत्ता नाही, तरी तक्रार नाही...
- धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : गेल्या दोन महिन्यांपासून भाईंदरच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अनोळखी म्हणून उपचार घेणाऱ्या ८५ वर्षीय अंध रुग्णाच्या मुलगी - जावयाचा शोध घेऊन वृद्धास त्याच्या नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वडील दोन महिन्यांपासून बेपत्ता असताना मुलगी व जावयाने ते बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांत दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रुग्णालयातून सोडा, घरी जायचे आहे
मीरा रोड स्टेशनजवळ रस्त्यावर पडलेल्या एका ८५ वर्षीय अंध वृद्धास एका जागरूक नागरिकाने उपचारासाठी भाईंदरच्या जोशी रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी दाखल केले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जफर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष गोरे त्यांच्यावर उपचार करीत होते.
उपचार, आहार आदींमुळे आजोबा यांची प्रकृती सुधारली. त्यांचे नाव सय्यद कादरी असल्याचे समजले. नालासोपारा येथील बिलालपाडा भागात दौलत नावाची मुलगी राहते इतकेच त्यांना सांगता येत होते.
रुग्णालयातून सोडा, घरी जायचे आहे, असे ते सतत सांगत होते. परंतु, मुलीचा नेमका पत्ता, पूर्ण नाव आदी काहीच माहीत नसल्याने रुग्णालयाचाही नाइलाज होता. कोणी बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांकडे नव्हती.
रुग्णवाहिकेतून नेऊन घेतला शोध
डॉ. तडवी यांच्या सूचनेनंतर गुरुवारी रुग्णवाहिकेमध्ये सय्यद कादरी यांना घेऊन रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते अजय वाघमारे हे नालासोपाराच्या बिलालपाडा येथे पोहोचले. वृद्ध कादरी यांना सोबत घेऊन अजय त्यांच्या मुलीची विचारपूस करीत फिरत होते. त्यावेळी तेथील दुबे शाळेजवळून गेल्यानंतर त्यांना दौलत ही तेथील एका जुन्या इमारतीत राहत असल्याचे समजले.
नातलग सापडल्याने आनंद
कादरी यांना घेऊन अजय त्यांच्या मुलीच्या घरी गेले. मुलीला पाहून कादरी यांना आनंद झाला. मुलगी दौलत आणि तिच्या पतीने अजय यांच्यासह डॉक्टर-कर्मचारी यांचे आभार मानले. दौलत आणि तिच्या घरचे कादरी यांचा शोध घेत होते. ते अधूनमधून असे हरवत असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती, असे दौलत यांनी सांगितले.