मुंबई : वैद्यकीय विश्वात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉ. टेमटन उडवाडिया (८९) यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. लेप्रोस्कोपिचे जनक म्हणून डॉ. उडवाडिया यांची ख्याती होती.
शरीरावर कोणतीही चीर न पाडता लेप्रोस्कोपिद्वारा शस्त्रक्रिया करण्याची पद्धत डॉ. उडवाडिया यांनी भारतात प्रथम सुरू केली. वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे डॉ. उडवाडिया यांना पद्मभूषण व पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. तसेच वैद्यकीय विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित समजला जाणारा डॉ. बी. सी. रॉय अवॉर्डही डॉ. उडवाडिया यांना देण्यात आला होता. भारत आणि अमेरिकेतील गॅस्ट्रोएंटेस्टिनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन या दोन संस्थानीही त्यांचा गौरव केला होता.
डॉ. उडवाडिया यांचे अनेक संशोधनपर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सर्जरी या विषयातील माहिती मिळावी म्हणून त्यांनी काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. त्यापैकी पेंग्विनने प्रकाशित केलेले ‘मोअर दॅन जस्ट सर्जरी’ आणि ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले ‘तबियत’ ही त्यांची पुस्तके खूप गाजली होती.
ते माझे हिंदुजा आणि जे. जे. रुग्णालयात वरिष्ठ सहकारी होते. अत्यंत शांत, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे असे व्यक्तिमत्व होते. जे. जे. रुग्णलयात ते मानद प्राध्यापक होते. विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये ते खूप प्रिय होते. त्यांनी सर्जरी क्षेत्रात मोठे काम उभारून ठेवले आहे. आज अनेक सर्जन त्यांनी उभारलेले काम पुढे घेऊन जात आहेत. - डॉ. गुस्ताद डावर, माजी अधिष्ठाता, जे. जे. हॉस्पिटल
मी कायम डॉ. उडवाडियांच्या संपर्कात होतो. त्यांना केइएममधील सर्जरी विभागाच्या इतिहासाची माहिती पाहिजे होती. त्यांचे एक पुस्तकांवर काम चालू होते. ते उत्तम लेखक होते. सर्जरी व्यतिरिक्त तत्त्वज्ञान या विषावर चांगले भाष्य करायचे.- डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम हॉस्पिटल.
आज आम्ही ज्या काही लॅप्रोस्कोपीने सहज शास्त्रकिया करत आहोत. त्याची सुरुवात डॉ. उडवाडिया सरांनी केली आहे. त्यांच्यामुळे शस्त्रक्रिया क्षेत्रात खूप मोठा अमूलाग्र बदल घडला. त्यांची काम करण्याची पद्धत आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती.- डॉ. संजय बोरुडे, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल.