लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीव धोक्यात टाकत बापाने आपल्या अकरा वर्षांच्या मुलाची मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप सुटका केली. आरे काॅलनी परिसरातील युनिट क्रमांक ३१ मध्ये हा प्रकार घडला आहे. स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
रोहित तिलक बहादूर (११) असे या मुलाचे नाव आहे. येथील युनिट क्र. ३१ मध्ये बहादूर कुटुंबीय सरदार बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कच्च्या झोपडीमध्ये राहतात. रोहित १८ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास किराणा दुकानामध्ये काही सामान आणण्यासाठी गेला होता.
सामान घेऊन घरी परतत असताना सरदार बंगल्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने रोहितवर हल्ला केला आणि त्याचा पाय जबड्यात पकडत त्याला जंगलात नेण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा घाबरलेल्या रोहितने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्याचा आवाज ऐकून घराबाहेर बसलेले त्याचे वडील तिलक बहादूर हे धावत आले आणि त्यांनी जिवाची पर्वा न करता बिबट्याच्या डोळ्यावर हातातील टॉर्चचा प्रकाश मारला. त्यामुळे बिबट्या बिथरला आणि रोहितला सोडून जंगलात पळाला. यामध्ये रोहितच्या पायाला दुखापत झाली. मात्र त्याचा जीव वाचला.
आरेमध्ये रात्रीच्या वेळी सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्याचा प्रकाश कमी होतो आणि बिबट्याचा वावर वाढतो. पावसाळ्यात जंगल वाढल्याने बिबटे याठिकाणी लपून बसल्याने येथील लहानमुले, वयोवृद्ध आणि पाळीव प्राण्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. याकडे दुग्धविकास आणि वनविभाग प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.