मुंबई : ओएलएक्सवरून सोफा विक्री करणे बीएमएसच्या विद्यार्थ्याला भलतेच महागात पडले आहे. यात ग्राहकच ठग निघाल्यामुळे विद्यार्थ्याला १ लाख ६८ हजार रुपये गमविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
माटुंगा परिसरात राहणाऱ्या तक्रारदार तरुणाने घरातील जुना सोफा विकण्याबाबत ९ जुलै रोजी जाहिरात दिली. १० जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्याला प्रशांत शर्मा नावाच्या व्यक्तीने संदेश धाडला. त्यानुसार, त्यांनी संबंधिताना कॉल केला. शर्माने तो अंधेरी येथून बोलत असल्याचे सांगून सोफा सेट विकत घेणार असल्याचे सांगितले. पुढे ४२ हजार ५०० रुपयांत व्यवहार ठरला. तरुणाने बुकिंगसाठी आधी १२ हजार रुपये पाठवावे लागतील, असे सांगितले. उर्वरित रक्कम देऊन सोफा घेऊन जाण्यास सांगितले. शर्मानेही होकार देताच, फोन कट केला.
पुढे रात्री ९ वाजता विशाल गर्ग नावाच्या व्यक्तीने कॉल करून तो शर्माचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले. पुढे तो ऑनलाइन पैसे पाठवित असल्याचे सांगितले. पेटीएमद्वारे पैसे पाठवित असताना ठगाने त्याला सांगितले की त्याने १२ हजार रुपये पाठविले तर त्याला २४ हजार रुपये खात्यात जमा होतील असे सांगितले. तरुणाला संशय आला म्हणून त्याने १ रुपया पाठविताच त्याच्या खात्यात दोन रुपये जमा झाले. त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला. तरुणाने १२ हजार पाठवताच त्याच्या खात्यातून एकूण ८४ हजार रुपये वजा झाले. पुढे आणखी वेगवगेळी कारणे पुढे करत, १ लाख ६८ हजार रुपये काढले. पुढे आणखीन कारणे देत असताना तरुणाला संशय आला. त्याने याबाबत माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत, अधिक तपास सुरू केला आहे.