फादर स्टॅन स्वामी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:25+5:302021-07-07T04:07:25+5:30
मुंबई : एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी (८४) यांचे निधन झाले. वांद्रे ...
मुंबई : एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी (८४) यांचे निधन झाले. वांद्रे येथील हॉली फॅमिली रुग्णालयात सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक केली होती.
स्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल ब्रीच कॅण्डी रूग्णालयाने सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने २ मे रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. कोरोना पश्चात आजार बळावल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हॉली स्पिरीट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, सोमवारी दुपारी १ वाजून २४ मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत बोलताना स्टॅन स्वामी यांचे मित्र तथा जेसीसूट्स ऑफ इंडियाचे सभासद डॉ. स्टॅनिस्लॉस डिसोझा यांनी सांगितले की, आदिवासी, दलित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी फादर स्टॅन स्वामींनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या जाण्याने अतीव दुःख होत आहेत. या न्यायालयीन लढाईत त्यांना सहकार्य करणारे त्यांचे कुटुंबीय, मित्र, कायदेतज्ज्ञ यांचे आभार. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. त्यांच्या अंत्यविधी बाबतची माहिती लवकरच कळविली जाईल.
…………….