Join us

पैशांसाठी मुलाने घेतला वडिलांचा चावा, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:41 AM

उच्च शिक्षणासाठी बंगळुरूच्या नामांकित इंजिनीअरिंग महाविद्यालयात दाखल केलेल्या मुलाकडून पैशांची मागणी वाढत राहिली.

- मनीषा म्हात्रे मुंबई : उच्च शिक्षणासाठी बंगळुरूच्या नामांकित इंजिनीअरिंग महाविद्यालयात दाखल केलेल्या मुलाकडून पैशांची मागणी वाढत राहिली. मुलाला बाइक रेसिंगचा नाद लागल्याचे समजताच वडिलांनी पैसे देणे बंद केले. त्या रागाने मुलाने आईवडिलांना बेदम मारहाण करीत वडिलांच्या छातीचा कडकडून चावा घेतल्याची घटना पवईच्या उच्चभ्रू वसाहतीत घडली. एअर फोर्समधील निवृत्त विंग कमांडर असलेल्या वडिलांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पवई हिरानंदानी परिसरात प्रमोद देशपांडे हे पत्नी, ९ वर्षीय मुलीसोबत राहतात. मुलगा साहील (२०) हा बंगळुरूतील महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. तो तेथेच राहतो. मुलाने शिक्षण घ्यावे यासाठी ते त्याचे सर्व हट्ट पुरवित होते. मात्र मुलाची पैशाची मागणी वाढतच गेली. चौकशीअंती मुलाला बाइक रेसिंगचा नाद लागल्याचे समजले. त्यांनी पैसे पाठविणे बंद केले. गेल्या महिन्याभरापासून साहिल फोनवरून वडिलांकडे बाइक रेसिंगसाठी सतत पैसे मागत होता. त्यांनी नकार दिल्याने शिवीगाळ, धमकी देणे सुरू होते. वडिलांनी मुलाचे फोन घेणे बंद केले. शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास तो घरी आला. पैसे न दिल्याने आईवडिलांना मारहाण केली. आईचे केस ओढून मारहाण केली. वडिलांच्या छातीचा चावा घेतला. टी.व्ही. फोडला. लहान बहिणीने मदतीसाठी शेजारच्यांकडे धाव घेतल्याने दोघांची सुटका झाली. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मुलापासूनच जिवाला धोका असल्याने देशपांडे यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.>अद्याप अटक नाही...पवई पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी साहिलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याला अटक नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई