Join us

पित्याला मिळणार स्वत:च्याच मुलीचा ताबा!, हायकोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 1:35 AM

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे नवी मुंबईत खारघर येथे राहणाऱ्या शेखर जगदीशप्रसाद तिवारी या इसमाला शिखा या स्वत:च्याच १७ महिने वयाच्या मुलीचा अखेर ताबा मिळणार आहे.

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे नवी मुंबईत खारघर येथे राहणाऱ्या शेखर जगदीशप्रसाद तिवारी या इसमाला शिखा या स्वत:च्याच १७ महिने वयाच्या मुलीचा अखेर ताबा मिळणार आहे.शेखर यांची ही मुलगी सध्या त्यांची दिवंगत पत्नी झेलम हिच्या अनिता परदेशी (सहकारनगर-२,पुणे) व तेजस्विनी गौड (खार, मुंबई) या दोन बहिणींकडे आहे. शेखर यांनी केलेली ‘हेबियस कॉर्प््स’ याचिका मंजूर करून न्या. इद्रजीत मोहंती व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने असा आदेश दिला की, अनिता व तेजस्विनी यांनी ६ फेब्रुवारीपासून १५ दिवसांत शिखाला शेखरकडे सुपूर्द करावे. गरज पडली तर या दोघींकडून शिखाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शेखर यांस मदत करावी, असेही निर्देश दिले गेले.शिखाच्या आईच्या दु:खद निधनानंतर तिचा प्रतिपाळ तिच्या या दोन मावश्यांनी केलेला असल्याने त्यांच्यात प्रेम व जिव्हाळ््याचे नाते निर्माण झाले असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे शिखाला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले तरी या दोन्ही मावश्या प्रत्येक रविवारी स. ९ ते सा. ६ या वेळेत शेखर यांच्या घरी जाऊन शिखाला भेटू शकतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.या प्रकरणात शिखाच्या मावश्यांनी असा युक्तिवाद केला की, आम्ही शिखाला तिच्या वडिलांकडे कधीच देणार नाही, असे आमचे म्हणणे नाही. ती अजून खूप लहान आहे व तिचे वडील एकटेच असल्याने आणखी काही दिवस तिला आमच्या देखरेखीखाली राहू द्यावे.न्यायालयाने म्हटले की, शिखाच्या जन्मानंतर जी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली त्यात दोन्ही मावश्यांनी तिला आपल्या ताब्यात घेऊन आत्तापर्यंत तिचा चांगला प्रतिपाळ केला, यात शंका नाही. परंतु शेखर हे तिचे जन्मदाते पिता असल्याने व दोन पालकांपैकी आता फक्त तेच एकटे हयात असल्याने त्यांना शिखाचा ताबा नाकारता येणार नाही. शिवाय चांगल्या नोकरीस असल्याने व आयुष्यात स्थिरस्थावर झालेले असल्याने एकटे असले तरी ते शिखाचा प्रतिपाळ करू शकणार नाहीत, असे मानण्याचे काही कारण नाही. अशा प्रकरणांत मुलांची इच्छा व त्यांचे हित विचारात घेतले जाते. पण शिखा वयाने खूपच लहान असल्याने तिच्या इच्छेचा प्रश्न येत नाही. स्वत:च्या वडिलांसोबत राहिल्याने तिच्या हिताला काही बाधा येईल, असे आम्हाला वाटत नाही.हा वाद का निर्माण झाला?एका नामांकित आयटी कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरी करणारे शेखर आणि झेलम यांचे २८ मे २००६ रोजी नवी मुंबईत लग्न झाले.शिखाच्या वेळी गरोदर असताना पाचव्या महिन्यात झेलमला स्तनाचा कर्करोग झाला असल्याचे निदान झाले.१४ आॅगस्ट २०१७ रोजी शिखाचा जन्म झाला.ती जेमतेम सव्वा वर्षाची असताना १७ आॅक्टोबर २०१८ रोजी तिची आई झेलम हिचे निधन झाले.त्यानंतर लगेचच शेखर हेही गंभीर आजारी झाले व काही महिने त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागले.मृत्यूपूर्वी दिलेला शब्द पाळून दोन्ही मावश्या शिखाला स्वत:कडे घेऊन गेल्या व त्यानंतर त्यांनीच तिचा सांभाळ केला.त्यांनी शिखाला सोपविण्यास नकार दिला म्हणून शेखर यांनी कोर्टात धाव घेतली.

टॅग्स :न्यायालय