Join us

Father's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 5:04 AM

अभ्यासासाठी केवळ आईच मदत करते, या जुन्या संकल्पनेला छेद

मुंबई : मुलांचे शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात त्यांच्या वडिलांचा वाटा मोलाचा आहे. प्रत्येक तीनपैकी एक पिता आपल्या मुलाला अभ्यासात मदत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागत असतो. आधुनिक वडील-मुलाच्या नात्याचे आयाम समजून घेण्यासाठी आणि विशेषत: मुलाच्या शैक्षणिक जीवनात पित्याच्या भूमिकेचे मूल्यमापन करण्यासाठी ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे.मुलाचे व्यक्तिमत्त्व आणि दृष्टिकोन घडवण्यात त्याच्या वडिलांची भूमिका कशी महत्त्वाची असते यावर या सर्वेक्षणातून प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या मुलांना त्यांच्या अभ्यासात केवळ त्यांची आईच मदत करते, या जुन्या संकल्पनेलादेखील या अभ्यासातून छेद देण्यात आला आहे.मुंबईतील सुमारे १ हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून असे दिसून आले की ७०% मुलांना शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात वडिलांची भूमिका महत्त्वाची वाटते. मुंबईत अनेक पिता आपल्या मुलांच्या शिक्षणात रस घेतात; पण त्यापैकी बरेचसे मुख्यत: त्यांच्या नोकरीच्या व्यस्ततेमुळे, मुलांना त्यांच्या अभ्यासात सक्रिय आणि परिणामकारकरीत्या मदत करू शकत नाहीत. तरीही ५६% पित्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणात खूप रस असल्याचे दिसून आले, पण त्यातील फक्त एकतृतीयांश मुलांना अभ्यासात मदत करू शकत आहेत. ४०% पिता आपल्या मुलांनी पुस्तके आणि नोट्स यांच्या माध्यमातून अभ्यास करावा अशा मताचे आहेत. तर ३०% पिता आपल्या मुलांसाठी आॅनलाइन किंवा डिजिटल मंचाची शिफारस करतात. अधिकाधिक पालक आता वैकल्पिक आॅनलाइन अभ्यास पद्धती आणि त्यांचे फायदे याबाबत जागरूक होत आहेत हे या निरीक्षणातून स्पष्ट होते.४८% पिता आपल्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि अशा प्रकारे अभ्यास आणि मौज यांच्यात चांगले संतुलन साधण्यात मदत करतात. सर्वेक्षणात सहभागींपैकी ७९% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना असे वाटते की, त्यांचे शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे.कलागुणांना देतात प्रोत्साहनवडील हे मुलांच्या अभ्यासेतर कलागुणांना अधिक प्रोत्साहन देत असल्याचे मुंबईत पाहायला मिळते. आपल्या मुलाच्या शिक्षणाव्यतिरिक्त त्यांच्या इतर कलागुणांना, त्यांच्यातील प्रतिभेलादेखील ते महत्त्व देत असतात हे एक उत्साहवर्धक लक्षण असल्याचे मत हे सर्वेक्षण करणाऱ्या ब्रेनलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल बोर्कोव्हस्की यांनी सांगितले.५६% वडिलांना मुलांच्या शिक्षणात खूप रस तर ४८% वडील मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी करतात प्रोत्साहित

टॅग्स :जागतिक पितृदिन