Join us

स्वभावाला कंटाळून केला वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:06 AM

दारूच्या नशेत आई, आजीला शिवीगाळ करणे, त्यात ऊठबस ओरडत राहणे अशा वडिलांच्या स्वभावाला कंटाळून मुलानेच नातेवाइकाच्याच मदतीने वडिलांचा काटा काढल्याची घटना सोमवारी वरळीत घडली.

मुंबई : दारूच्या नशेत आई, आजीला शिवीगाळ करणे, त्यात ऊठबस ओरडत राहणे अशा वडिलांच्या स्वभावाला कंटाळून मुलानेच नातेवाइकाच्याच मदतीने वडिलांचा काटा काढल्याची घटना सोमवारी वरळीत घडली. अनिल रोहिदास बोबडे (४५) असे मृत इसमाचे नाव असून वरळी पोलिसांनी या प्रकरणी मुलासह मेहुण्याला अटक केली आहे.वरळी येथील डॉ. ई. मोझेस रोड परिसरात बोबडे पत्नी आणि मुलगा दुर्गेशसोबत (१८) राहायचे. त्याच परिसरात त्यांचा मेहुणा राकेश हिरानंद खोपकरही राहायचा. गेल्या काही दिवसांपासून बोबडे पत्नी आणि सासूचा राग राग करायचे. त्यात दारूच्या नशेत पत्नीला मारझोडही करत होते. दुर्गेशलाही ऊठबस ओरडत होते. दुर्गेशही वडिलांच्या रोजच्या वागणुकीला कंटाळला, तर दुसरीकडे ते मेहुण्यालाही घरी उभे करत नसल्यामुळे त्याचाही त्यांच्यावर राग होता.याच रागात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बोबडे यांनी सासूला शिवीगाळ सुरू केली आणि मेहुण्यालाही उलटसुलट बोलले.हाच राग मनात धरून मुलगा दुर्गेश आणि मेहुण्याने जवळच्या लाकडी बांबूने त्यांना मारहाण सुरू केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच दोघेही भानावर आले. घटनेची वर्दी लागताच वरळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला.या प्रकरणी मुलासह मेहुण्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून न्यायालयाने त्यांना २३ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन देसुरकर यांनी दिली. दोघांच्या चौकशीत उपरोल्लेखित घटनाक्रम उघडकीस आला.