"जय शाहने सचिनला क्रिकेट शिकवलं का?"; उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:42 AM2024-03-05T11:42:30+5:302024-03-05T12:35:25+5:30
अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना उबाठा पक्षाने भाजपाविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईतील पनवेल येथील जाहीर सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेला प्रत्त्युतर देत जय शाह यांच्या निवडीबद्दल प्रश्नही उपस्थित केला. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांवर निशाणा साधला होता. त्यानंतर, जय शाह यांच्या निवडीबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अमित शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या घराणेशाहीवर भाष्य केले. यावेळी, त्यांनी इंडिया आघाडीच्या पक्षातील नेत्यांवरही जोरदार प्रहार केला. त्यामध्ये, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंसह, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्यावरही घराणेशाहीवरुन निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे, असे म्हणत अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. त्यावर, आता स्वत: उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून अमित शाह यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असा टोलाही लगावला.
अमित शाह तोंड वर करुन जेव्हा घराणेशाहीवर बोलतात की, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे?. होय, मला करायचंय मुलाला मुख्यमंत्री, पण ह्यांनी मतं दिली तर मुख्यमंत्री होईल ना. कारण, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना टोला लगावला. तसेच, अमित शाह उद्या महाराष्ट्रात येत आहेत, त्यांनी उत्तर द्याव, जय शाहचं क्रिकेटमधील योगदान काय आहे?. जय शाह यांनी सचिन तेंडुलकरला शिकवलं, विराट कोहलीला शिकवलं की, आत्ताच्या यशस्वी जैस्वालला शिकवलं, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. दरम्यान, यापूर्वी खासदार संजय राऊत यांनीही अमित शाह यांच्या टीकेला उत्तर देताना अशाच प्रकारे प्रश्न उपस्थित केला होता.
संजय राऊत यांनीही लगावला टोला
अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे. जय शाह यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त षटकार मारले होते का?, जय शाह यांनी सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले होते का?, जय शाह यांनी कपिल देवपेक्षा जास्त क्रिकेट खेळलं आहे का, ज्यामुळे त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव केले, असे सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, जर अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी बनले असते का, असेही राऊत यांनी म्हटले.