मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या पित्याची आत्महत्या
By Admin | Published: April 16, 2016 02:05 AM2016-04-16T02:05:32+5:302016-04-16T02:05:32+5:30
मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे ५५ वर्षीय वृध्दाने खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे ५५ वर्षीय वृध्दाने खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. अखेर गुरुवारी संध्याकाळी दूध आणण्याच्या बहाण्याने त्यांनी घराबाहेर जाऊन आत्महत्या केली.
अशोक बाईत (५५) असे मयत पित्याचे नाव असून, ते वाशी सेक्टर ५ येथे येथील कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमध्ये सहकुटुंब राहत होते. ३१ जानेवारी रोजी त्यांचा मुलगा निमिश (३५) याचे आजारामुळे निधन झाले. तरुण मुलगा गेल्याचे प्रचंड दु:ख त्यांना झाले होते. हे दु:ख त्यांनी अनेकदा घरच्यांसमोर देखील व्यक्त केले होते. शिवाय आत्महत्येची इच्छा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त करून दाखवली होती. तर अनेकदा राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु प्रत्येक वेळी कुटुंबाचा विचार करून ते परत घरी यायचे. अनेक वेळा त्यांच्या मुलीने त्यांचे नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र गुरुवारी संध्याकाळी आत्महत्येचा ठाम निर्धार करून त्यांनी वाशी खाडीपुलावरून आत्महत्या केली. मुलाच्या निधनाचे दु:ख असतानाच दोन विवाहित मुलींच्या सुखी संसाराचीही चिंता त्यांना सतावत होती. यामुळे ते अधिकच खचलेले होते.
गुरुवारी संध्याकाळी दूध आणण्याच्या बहाण्याने ते घराबाहेर निघून थेट खाडीपुलावर
पोचले. तिथून मुलीला फोन करून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. परंतु ते कुठे आहेत,
हे सांगितले नव्हते. यामुळे
नेहमीप्रमाणे मुलीने त्यांची समजूत काढून घरी येण्यास सुचवले. त्यानंतर काही वेळाने मुलीने त्यांच्या मोबाइलवर संपर्क केला असता संपर्क झाला नाही. यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह पुलालगत पोलिसांना आढळून आला. मुलाच्या विरहातच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
...तर प्राण वाचले असते
अशोक बाईत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी खाडीपुलावर कपडे, घड्याळ व मोबाइल ठेवला होता. परंतु अज्ञाताने घटनास्थळावरून त्यांचा मोबाइल चोरून नेला.
त्याचवेळी बाईत यांची मुलगी वडिलांशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती; परंतु त्या अज्ञात व्यक्तीने आपल्याला मोबाइल सापडला, असे सांगून नंतर तो बंद केला. या व्यक्तीने वेळीच पोलिसांना माहिती दिली असती तर बाईत यांचे प्राण वाचू शकले असते.