नवी मुंबई : गतिमंद मुलाची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याचा प्रकार सीबीडी येथे घडला. ते वजन मापे विभागाचे निरीक्षक असून, एक महिन्यापूर्वीच बदली होऊन आले होते. माझाच मुलगा गतिमंद का, यावरून ते चिंतित होते.सीबीडी सेक्टर १५ येथे हा प्रकार घडला. मनोहर पवार (४१) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सांगली येथून नवी मुंबईत कोकण भवन विभागात त्यांची बदली झाली होती. पत्नी मानसी व मुलगा कौशल (१४) यांच्यासोबत ते सीबीडीमध्ये राहत होते. जन्मापासून गतिमंद असलेल्या कौशलवर त्यांचे प्रेम होते, परंतु सहकारी अधिकाऱ्यांची मुले चांगली असताना आपलाच मुलगा गतिमंद का, यावरून ते नेहमी चिंतित असायचे. तसे त्यांनी आईला व पत्नीला सांगितलेही होते.गुरुवारी संध्याकाळी ते पत्नी व मुलगा कौशल याला मॉलमध्येदेखील घेऊन गेले होते. त्यानंतर, रात्री ८च्या सुमारास कारमधून मुलाला सोबत घेऊन गेले, परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यामुळे पहाटे पत्नीने ते हरवल्याची तक्रार केली होती. याचदरम्यान, नातेवाईकांच्या मदतीने ते परिसरात शोधाशोध करत असताना, घरापासून काही अंतरावर गुरुद्वारासमोरील रस्त्यालगत त्यांची कार आढळली, तर कारमध्ये बाप-लेकाचा मृतदेह पडलेला होता. याची माहिती मिळताच उपायुक्त प्रशांत खैरे, सहायक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक दिनकर काणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.मुलाची हत्या करून मनोहर यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचे उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. याकरिता कार्बनडाय आॅक्साइडच्या सिलिंडरचा वापर करण्यात आलेला आहे. मनोहर यांनी २ जुलै रोजी ई-मेलवरून कार्बनडाय आॅक्साइडचा सिलिंडर मागवला होता. त्याचे ८ हजार रुपयांचे बिलदेखील त्यांनी चेकद्वारे भरले होते. हा सिलिंडर त्यांच्या अल्टो कारमध्येच मागच्या भागात ठेवलेला होता. (प्रतिनिधी)
मुलाची हत्या करून पित्याची आत्महत्या
By admin | Published: July 09, 2016 2:07 AM