Join us

महिला शिक्षण दिनात फातिमा शेख यांचाही उल्लेख करावा - नसीम खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:06 AM

महिला शिक्षण दिनात फातिमा शेख यांचाही उल्लेख करावा - नसीम खानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी ...

महिला शिक्षण दिनात फातिमा शेख यांचाही उल्लेख करावा - नसीम खान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ३ जानेवारी हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. फातिमा शेख यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी यात त्यांच्या नावाचा समावेश करावा. हा दिवस ‘सावित्रीबाई फुले व फातिमा शेख महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मुंबई काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष नसीम खान यांनी केली.

नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पाठवून सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन या नावात फातिमा शेख यांच्या नावाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. सावित्रीबाईंच्या नावे महिला शिक्षण दिन साजरा करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच नसीम खान यांनी फातिमा शेख यांचे योगदान विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. ज्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती, त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. अनेक अडचणींचा सामना करत, प्रत्येक प्रसंगाला तोंड देत त्यांनी मुलींना शिकविण्याचे काम केले. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात त्यांना मोलाची साथ देणाऱ्या शिक्षिका फातिमा शेख यांचेही योगदान विसरण्यासारखे नाही. पुण्यात ज्या घरात मुलींची शाळा सुरू करण्यात आली, त्या मुस्लिम बांधव उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख होत्या. सावित्रीबाई फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन शिक्षिका बनणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील त्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खांद्याला-खांदा लावून फातिमा शेख यांनीही मुलींना शिक्षण मिळावे म्हणून खूप संकटांचा व अडचणींचा सामना केला होता. त्यामुळे या दिनात त्यांच्या नावाचा समावेश करण्याची मागणी नसीम खान यांनी केली आहे.