चुकीची जाहिरात करून उत्पादनाची विक्री, एफडीएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:02 AM2020-01-08T01:02:04+5:302020-01-08T06:46:12+5:30

डिलीसीयस फॅट स्प्रेड अ‍ॅण्ड अमुल लाइट फॅट स्प्रेड या अन्नपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या राज्यातील नामांकित पेढ्यांच्या विविध ठिकाणी असणा-या कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून ‘फॅट स्प्रेड’चे नमुने ताब्यात घेतले.

FDA action to sell a product by false advertising | चुकीची जाहिरात करून उत्पादनाची विक्री, एफडीएची कारवाई

चुकीची जाहिरात करून उत्पादनाची विक्री, एफडीएची कारवाई

Next

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत गुप्त वार्ता (अन्न) विभागाने न्युट्रालाइट फॅट स्प्रेड, डिलीसीयस फॅट स्प्रेड अ‍ॅण्ड अमुल लाइट फॅट स्प्रेड या अन्नपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या राज्यातील नामांकित पेढ्यांच्या विविध ठिकाणी असणा-या कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून ‘फॅट स्प्रेड’चे नमुने ताब्यात घेतले. कंपनीने ‘झीरो कॉलेस्ट्रॉल’, ‘लो फॅट लो कॉलेस्ट्रॉल’ अशी जाहिरात उत्पादनावर केली आहे. अशी जाहिरात करून उत्पादन विकणे हे अन्न सुरक्षा कायद्याने गुन्हा असून एफडीने फॅट स्प्रेड या अन्नपदार्थाचा एकूण ६९ लाख ३४ हजार २३२ रुपयांचा साठा जप्त केला आहे.
पनवेल येथील झायडस वेलनेस प्रा.लि. या कंपनीतून कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी ‘न्युट्रालाइट फॅट स्प्रेड’ या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ५० लाख ४५ हजार २८६ रुपयांचा साठा जप्त केला. गुजरात को-आॅप. मिल्क फेडरेशन लि., गोरेगाव (पू.) येथून ‘डिलीसीयस फॅट स्प्रेड व अमुल लाइट फॅट स्प्रेड’ या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ९ लाख ३ हजार ४९० रुपयांचा साठा जप्त केला.
तसेच औरंगाबादेतून १२ हजार ८४८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय, रायगड जिल्ह्यातील ट्रेन्ट हायपर मार्केट प्रा.लि. कंपनीतून ‘डिलीसीयस फॅट स्प्रेड व अमुल लाइट फॅट स्प्रेड’ या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ५२ हजार ९६० रुपयांचा साठा जप्त केला.
सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण १.५ ग्रॅम/१०० ग्रॅम असणे आवश्यक आहे. मात्र या उत्पादनामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण ३५ ग्रॅम/१०० ग्रॅम असल्याचे लेबलवरून दिसून येत आहे, ते चुकीचे आहे. न्युट्रालाइट फॅट स्प्रेड या अन्नपदार्थाच्या बाबतीत ‘नॅच्युरली झीरो कॉलेस्ट्रॉल’ असा दावा करण्यात आला आहे. अन्नपदार्थांच्या लेबलवर ३५ ग्रॅम आॅफ सॅच्युरेटेड फॅट्स असे नमूद करण्यात आले आहे. डिलीसीयस फॅट स्प्रेड या अन्नपदार्थांच्या बाबतीत ‘झीरो कॉलेस्ट्रॉल’ असा दावा करण्यात आला आहे. अन्नपदार्थांच्या लेबलवर ३७ ग्रॅम आॅफ सॅच्युरेटेड फॅट्स असे नमूद करण्यात आले आहे. तसेच अमुल लाईट फॅट स्प्रेड या अन्नपदार्थाच्या बाबतीत ‘लो फॅट लो कॉलेस्ट्रॉल’ असा दावा करण्यात आला आहे. अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित कंपन्यांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.
>नाशिक, भिवंडीतून साठा जप्त
गुजरात को-ऑप. मिल्क फेडरेशन लि., गोरेगाव (पू.) येथून ‘डिलीसीयस फॅट स्प्रेड व अमुल लाइट फॅट स्प्रेड’ या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ९ लाख ३ हजार ४९० रुपयांचा साठा जप्त केला.भिवंडीतून ८ लाख १२ हजार ६१८ रुपयांचा साठा, नाशिक जिल्ह्यातून १ लाख ७ हजार ३० रुपयांचा साठा जप्त केला़

Web Title: FDA action to sell a product by false advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.